सेंद्रिय व रासायनिक शेती मधील फरक (लेख क्रमांक ६)

श्री रवींद्र थत्ते,
संचालक,
इको ऍग्रो ग्रुप, पुणे.
सेंद्रिय व रासायनिक शेती मधील फरक.

रासायनिक शेती:

यापद्धतीमध्ये माती व वनस्पतीं दोन्ही जिवंत असून स्वयंपूर्ण तसेच स्वत:ची देखभाल करू शकतात हे मुद्दे गौण ठरवून, अधिक उत्पादनासाठी सिंचन, मशागत, पीक पोषण अन्नद्रव्ये, PGR, जैव-उत्तेजक पुरवली जातात. शिवाय पिकाचे उत्पादन कमी करणाऱ्या सर्व बाबी नियंत्रित करण्यासाठी कीड/बुरशी/तण नाशकांचा वापर केला जातो. बियाणे देखील, केवळ जास्त उत्पाद्नाचे उद्दिष्ट ठरवून केलेलं असते व रासायनिक पद्धतीला अनुरूप असते. 

सेंद्रिय, शाश्वत, पुनरुत्पादक शेती पद्धत: 

यामध्ये नैसर्गिक जैविक प्रणालीला काम करण्याची संधी दिली जाते. (वनस्पती व जीव शास्त्र)

यामध्ये:

  • जमिनीची मशागत नाही.
  • सेंद्रिय भर खतांचा वापर.
  • आच्छादन, मिश्र पिकांचा वापर.
  • कीड-रोग प्रतिकारक, पाण्याचा ताण सहन करणाऱ्या स्थानिक जातींचा वापर.
  • रासायनिक कीटक/बुरशी/तण नाशकांचा वापर नाही.  

रासायनिक व शाश्वत सेंद्रिय शेतीमधील महत्वाचे फरक.


* आयोनिक (उपलब्ध) स्थितीमधील नत्र-स्फुरद-पालाश यातील सेंद्रिय का रासायनिक हा फरक वनस्पतीला ओळखता येत नाही आणि त्या दृष्टीकोनातून हा वादग्रस्त मुद्दा आहे. 

** Nutrient density in food: कमी कॅलरी व अधिक अन्नद्रव्य. सेंद्रिय वनस्पतीजन्य खाद्य पदार्थांमध्ये जीवनसत्व, अँटी-ऑक्सिडेंट घटक जास्त असतात असे दिसून येते. १९५० ते १९९९ पर्यंत केलेल्या अभ्यासामध्ये प्रचलित पद्धतीने उत्पादन केलेल्या अन्न पदार्थातील लोह, कॅल्शियम, स्फुरद, जीवनसत्व-अ, ब२, क यामध्ये ५-३५% घट दिसून आली.

*** नैसर्गिक स्वाद व सुगंध यामध्ये निश्चितच फरक आहे असे मानणारा मोठा वर्ग आहे, पण पुराव्या बाबत काही वाद आहेत. 

**** व्याखे नुसार कोणतीही रसायने न वापरता नैसर्गिक जमिनीमध्ये केलेली लागवड व त्यामधील अन्नाला सेंद्रिय उत्पादन समजले जाते. मात्र हायड्रोपोनिक पद्धतीने नारळाचा भुसा किंवा कृत्रिम माध्यमांचा वापर केला तरी अमेरिकेमध्ये उत्पादनाला सेंद्रिय प्रमाणित करता येते. याबाबत खूप आक्षेप आहेत.

नैसर्गिकरित्या जमीनीमध्ये पीक वाढत असताना त्यामध्ये हजारो जैव रसायने वनस्पतीच्या रक्षणासाठी किंवा अन्य उपयोगासाठी तयार होत असतात. पॉलिहाउस सारख्या वातावरणात जिवंत माती ऐवजी कृत्रिम माध्यम वापरून हवा सूर्यप्रकाश, कर्ब वायू , पाणी इत्यादी अत्यंत नियंत्रित ठेवले तरी कीड रोग यापासून बचाव करता येत नाही व तिथे देखील कीटक/बुरशी नाशके वापरावीच लागतात. त्याशिवाय यातील भाजी, फळ दिसायला खूप आकर्षक असली तरी तिच्या मध्ये जमिनीत वाढलेल्या वनस्पतीसारखे जैव रसायने नाहीत. आणि त्यांना कृत्रिमच म्हणायला हवे.  

रासायनिक, एकात्मिक किंवा सेंद्रिय अशी कोणतीही शेती पद्धत अवलंबत असलो तरी उत्पादकता टिकवून ठेवण्यासाठी, खर्च कमी होण्यासाठी किमान जमिनीच्या आरोग्याकडे लक्ष देणे अत्यवश्यक आहे.   

संवर्धित शेती / शून्य किंवा कमी  मशागत शेती, सेंद्रिय शेती : सुरुवात व वाटचाल.

कमी मशागत/ शून्य मशागत याचा वापर अमेरिकेत व इतर अनेक देशांमध्ये सुमारे ५० वर्षापासून वाढू लागला. प्रचलित शेतीमध्ये दुष्परिणामांना पर्याय म्हणून सेंद्रिय, शाश्वत, पुनरुत्पादित, अन्नद्रव्यांची अधिक घनता असेलेले सुरक्षित अन्न तयार करण्याच्या विचारांनी काही लोकांनी परिवर्तन करण्यास सुरुवात केली. प्रकाशित शास्त्रोक्त माहिती व तज्ञ मार्गदर्शक यांच्या अभावामुळे अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागले व नुकसान पण सोसावे लागले. मात्र सूक्ष्म निरीक्षण करण्याची क्षमता, होणाऱ्या परिणामाची मोजदाद व टीपण ठेवण्याची सवय यामुळे शास्त्र विकसित होत गेले. हळू हळू अधिक लोकं त्याचा स्वीकार करू लागले. अमेरिकेत देखील आच्छादन पिकांचा वापर करताना कोणत्या वनस्पती, एकरी प्रमाण किती इत्यादी बाबत माहिती प्रयोगातूनच मिळत गेली व इतरांपर्यंत पोहचत गेली. यानंतर जमिनीच्या स्वास्थासाठी संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांकडून (सूक्ष्मजीव शास्त्र, कृषिविद्या शास्त्र, मृदा शास्त्र) या ज्ञानात भार पडत गेली व हळू हळू शास्त्र विकसित होत गेले. कमी श्रमात व कमी खर्चामध्ये चांगल्या प्रकारे उत्पादन मिळू शकते, आर्थिक फायदा होतो व त्याशिवाय पर्यावरणाचा फायदा, अधिक सकस अन्नधान्य इत्यादी फायदे होतात. म्हणून अनेक शेतकऱ्यांनी हि पद्धत स्वीकारली.   

पूरक व अत्यावश्यक सेवा (जसे योग्य प्रकारे माती परीक्षण, निरनिराळ्या आच्छादन वनस्पतींचे बियाणे उपलब्ध करणाऱ्या कंपन्या, मशागत न करता बियाणे टोकणारी यंत्रे व उच्च शिक्षित तसेच प्रशिक्षित सल्लागारांचे मार्गदर्शन, कार्यशाळा इत्यादी) उपलब्ध होत गेल्यामुळे आज लाखो एकर वर अशा प्रकारची शेती केली जाते.  

यामधील सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे जमीनीच्या जैविक गुणधर्माकडे लक्ष देणे. 
आकृती १
आकृती २

आकृती ३ 
आपल्याला माहित आहे कि, आदर्श जमिनीमध्ये २५% हवा, २५% पाणी, ४५% खनिज पदार्थ आणि ५% हे सेंद्रिय कर्ब + पिकांची मुळे + सूक्ष्मजीव असतात (आकृती १). आपण जेव्हा मातीचे परीक्षण करतो तेव्हा, त्यातील ४५% असणाऱ्या खनिज पदार्थांबाबत माहिती मिळते, पण मातीतला ५% सजीव असलेला भाग व त्यांचे कार्य याबाबत कोणतीही माहिती मिळत नाही (आकृती ३). वरील आकृती २ प्रमाणे ५% सजीवांमध्ये ४०% जीवाणू व ॲक्टिनोमायसेट्स, ४०% इतर बुरशी, शैवाल इत्यादी, १२% गांडुळे, ५% जमिनीत राहणारे लहान प्राणी व ३% जमिनीत राहणारे इतर सूक्ष्मप्राणी असतात. या ५% सजीवांची काळजी म्हणजेच जमिन सुधारण्याचे कार्य आहे.

जमिनीचे गुणधर्म:
जैविकरासायनिक व भौतिक या मातीच्या तीन गुणधर्मांवरती शेती आधारित आहे. तीन पायाच्या स्टुलाप्रमाणे हे तिन्ही गुणधर्म तितकेच महत्वाचे आहेत. खालील चित्रात दाखवल्याप्रमाणे यातील एक देखील पाय मोडला / अधू असेल तर स्टूल उभा राहू शकत नाही.

दुर्दैवाने शेतकरी फक्त रासायनिक गुणधर्मांच्या कडे लक्ष देत आहे. बहुतेक शेतकऱ्यांनी जमिनीच्या भौतिक गुणधर्मासाठी माती परीक्षण केलेलेच नाही. जैविक गुणधर्माबाबत सुटसुटीत चाचण्या उपलब्ध नाहीत व त्याबाबतची माहिती देखील उपलब्ध नसल्यामुळे याबबत कोणीही लक्ष दिलेले नाही. त्यामुळे जमिनीच्या मर्यादा व गुणधर्म माहित नसल्याने त्यामध्ये सुधारणा करता येत  नाही. जैविक गुणधर्माकडे पूर्णतः दुर्लक्ष केल्याने मातीचे आरोग्य पूर्णपणे बिघडले असून उत्पादनामध्ये घट येत आहे.   

अधिक प्रमाणात रासायनिक खते वापरून सुरुवातीची ३०-४० वर्ष चांगले उत्पादन मिळाले, मात्र मागील २० वर्षापासून उत्पादनातील वाढ खुंटली आहे व अनेक भागात व अनेक पिकांमध्ये तिच्यामध्ये घट सुद्धा झाली आहे.  

अमेरिकेत देखील, मक्यामधील उत्पादन १८६० ते १९३० पर्यंत स्थिर होते व रासायनिक खते वापरायला सुरुवात केल्यावर त्यामध्ये खूप वाढ होत गेली. (संदर्भ USDA-२०११)

मात्र १९८० पासून वाढ खुंटली आहे. सोयाबीन मध्ये देखील तेच दिसून येते. (वरील आकृती पहा). भारतात देखील भात, गहू, ऊस यासारख्या पिकांमध्ये बियाणातील सुधारणा व त्यासोबत रासायनिक खतांच्या वापरामुळे उत्पादनात कैक पटीने वाढ झाली. मात्र अनेक वर्षापासून वाढ खुंटली असून अधिक खतांच्या वापर करूनही पूर्वीएवढे उत्पादन मिळत नाही.

हि परिस्थिती जमिनीतील जीव शास्त्राकडे सर्वथा दुर्लक्ष केल्यामुळे झालेली आहे.

सदर लेखमालेतील लेख आवडला असल्यास इतरांना या लेखाची लिंक पुढे पाठवा तसेच या ब्लॉगला फॉलो (Follow) करा. Follow करण्यासाठी https://ecoagroservices.blogspot.com/ या लिंकला जा व पान उघडा. पानाच्या खालच्या उजव्या कोपऱ्यात  या चौकटीवर क्लिक आहे त्यावर क्लिक करा.  नवीन लेख प्रकाशित होताच त्याची सूचना तुम्हाला ई-मेल द्वारे प्राप्त होइल

लेखाबाबत काही प्रश्न / सूचना असल्यास आपण ecoagropune@gmail.com या ई-मेलच्या माध्यमातून आम्हाला पाठवू शकता. 

Comments