देशी/ विदेशी गोवंश (लेख क्रमांक १०)

श्री रवींद्र थत्ते,
संचालक, 
इको ऍग्रो ग्रुप, पुणे,

देशी/ विदेशी गोवंश:

अनेक वेळा देशी गोवंश श्रेष्ठ, देशी गाईचे दुध, तूप श्रेष्ठ अथवा स्लरी / शेणखत बनवताना देखील देशी गोवंशाचेच वापरावे या बाबत सल्ला दिला जातो. यामध्ये श्रद्धेचा अथवा आवड असण्याबाबत कोणताही दुमत नाही व ते पसंत करायचा त्यांना पूर्ण अधिकार देखील आहे. याबाबत शास्त्रीय संशोधन झाल्याचे फारसे आढळून येत नाही. केरळ मधील एका शाळेतल्या मुलीने याबाबत केलेला प्रयोग त्यामुळेच महत्वाचा आहे. दि न्यू इंडियन एक्सप्रेस, २८ जानेवारी २०२१ या वर्तमानपत्रामध्ये "देशी गाईचे शेण हे निकृष्ट दर्जाचे खत आहे". अशा आशयाची बातमी दिली आहे. सदर संशोधनाबाबत थोडक्यात माहिती खाली दिली आहे. (मूळ इंगजी भाषेतील बातमी पाहण्यासाठी लिंक खाली दिली आहे.)

सदर संशोधन शाळकरी मुलीने केलेलं असून कदाचित सखोल, परिपूर्ण, संख्या शास्त्रानुसार अचूक नसेलहि, तरी देखील शेती/ग्रामीण प्रश्नांशी संबंधित असल्याने महत्वपूर्ण आहे. अशा प्रकारचे अगदी घरच्या घरी करता येणारे शास्त्रीय प्रयोगांद्वारे अनेक प्रश्नांची उत्तरे शोधता येतील व ते करणे गरजेचे आहे.  

सर्व शिक्षा अभियानातर्फे आयोजित राज्यस्तरीय विज्ञान मेळाव्यासाठी अरुणिमा एम(इयत्ता ११ वी, शासकीय उच्च माध्यमिक विद्यालय, कन्हनगड, जिल्हा कासारगोडहिच्या ८ प्रकारच्या देशी गाईं व होल्स्टाईन फ्रिशियन या विदेशी जातीच्या गाईंच्या शेणाचा पीक वाढीसाठी होणाऱ्या उपयोगाबाबत केलेल्या संशोधनाची निवड करण्यात आली. त्या संशोधनातील काही ठळक बाबी खालील प्रमाणे:

प्रयोग: तिने एकाच गोशाळेतील ८ देशी गोवंश : गीर कांकरेज (गुजरात); गिडा हाळीकर (कर्नाटक); कासारगोड ड्वार्फवेचूर (केरळ); ओंगोले (आंध्र प्रदेश); आणि कांगयाम (तामिळनाडू). तसेच शेजारील गोठ्यातील होल्स्टाईन फ्रिशियन या विदेशी गोवंशाच्या शेणाचा प्रयोग केला. यामध्ये तिने प्रत्येक गोवंश गाईचे शेण गोळा केले व वाळवले. तसेच प्रयोगाच्या ठिकाणची माती सुद्धा बारीक चाळून घेतली. सदर ८ देशी गाईचे शेण + १ होल्स्टाईन फ्रिशियनचे शेण व १ फक्त माती (= बिगर शेण) भरलेला कप (कंट्रोल) असे एकूण १० कप x चवळी (= long bean), मोहरी आणि भेंडी अशी 3 पिके x १० प्रतिकृति = असे एकूण ३०० कप भरून घेतले व त्यामध्ये बिया पेरल्या. प्रत्येक कपाला समान सूर्यप्रकाश आणि पाणी दिले गेले. आठवड्यातून एकदाच वाळलेले शेण समप्रमाणात (कंट्रोल व्यतिरिक्त) सर्व कपला दिले. मातीच्या कपमध्ये इतर कोणत्याही प्रकारचे खत टाकले नाही.

* देशी गोवंशाच्या कासारगोड ड्वार्फ आणि वेचूर या अतिशय लहान (बकरीच्या आकाराच्या गाई) असतात.

** सर्व गोवंशाच्या दुभत्या गाईंचे शेण गोळा केले होते.  

वेचुर गोवंश (केरळ)

निरीक्षण: प्रत्येक आठवड्याला रोपांची लांबी, पानांची लांबी-रुंदी, देठाची जाडी तपासली.

  • एका आठवड्यानंतर, होल्स्टाईन फ्रिशियनमध्ये पेरलेली चवळी सरासरी १२ सें.मी. पर्यंत वाढली; तर कासारगोड ड्वार्फ आणि वेचूर यांच्या शेणा पेरलेल्या बिया फक्त ५ सें.मी वाढल्या. शेण नसलेल्या (फक्त माती असलेल्या) कपमध्ये रोप ९ सेंटीमीटर उंच वाढले. "म्हणजे कासारगोड ड्वार्फ आणि वेचूरचं शेण निव्वळ मातीपेक्षा कमी कार्यक्षम होतं.  
  • ६० दिवसांनंतर होल्स्टाईन फ्रिशियनच्या शेण दिलेली चवळी १२८ सेंटीमीटर पर्यंत वाढली. कासारगोड ड्वार्फ आणि वेचूरच्या शेणामुळे तयार झालेली चवळी २२ सेंटीमीटर लांब वाढली, जी निव्वळ मातीमध्ये पेरलेल्या बीपेक्षा फक्त २ सेंटीमीटर लांब होती.
  • होल्स्टाईनच्या शेणखतामधील चवळीची सरासरी देठाची जाडी फक्त माती असलेल्या व कासारगोड ड्वार्फ, वेचूर आणि कंक्रेज यांच्या शेणातील रोपांपेक्षा दुपटीने जास्त होती. 

निष्कर्ष:

  • सेंद्रिय खतावर अवलंबून असलेले अनेक पारंपरिक शेतकरी देशी गाईंच्या शेणाला महत्व देतात. परंतु कासारगोड ड्वार्फ आणि वेचूर या जगातील सर्वात लहान जातींच्या गाईंचे शेण इतर सर्व देशी गाईंच्या शेणापेक्षा सर्वात कमी कार्यक्षम आढळले.  
  • होल्स्टाईन फ्रिशियन या गायीचे शेण इतर सर्व भारतीय (देशी) गाईंच्या शेणा पेक्षा खूप मोठ्या प्रमाणात कार्यक्षम आढळले. 

पडन्नक्कड, येथील कृषी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. पी. आर. सुरेश यांच्या नुसार

  • गाईची जात/ वंश महत्वाचा नसून तिचा आहार महत्वाचा आहे.
  • दूध देणाऱ्या गाईंना, दुधाचे प्रमाण, वय यानुसार चारा / पशुखाद्य - चांगला आहार दिला जातो त्यामुळे त्यांचे शेण हि चांगले असते. 

डॉ. जैस्मीन एम शाह, सहाय्यक प्राध्यापक, वनस्पती विज्ञान विभाग, केरळ केंद्रीय विद्यापीठ यांच्या मते 

  • गाईंचा पोटातील मायक्रोफ्लोरा मुळे हा फरक असू शकतो. वेगवेगळ्या जातींमध्ये वेगवेगळा मायक्रोफ्लोरा असू शकतो.

इंग्रजी लेखाची लिंक

https://www.newindianexpress.com/states/kerala/2021/jan/28/cow-dung-of-native-breeds-is-low-quality-manure-finds-schoolgirls-research-2256092.html

सदर लेखमालेतील लेख आवडला असल्यास इतरांना या लेखाची लिंक पुढे पाठवा तसेच या ब्लॉगला फॉलो (Follow) करा. Follow करण्यासाठी https://ecoagroservices.blogspot.com/ या लिंकला जा व पान उघडा. पानाच्या खालच्या उजव्या कोपऱ्यात  या चौकटीवर क्लिक आहे त्यावर क्लिक करा.  नवीन लेख प्रकाशित होताच त्याची सूचना तुम्हाला ई-मेल द्वारे प्राप्त होइल

लेखाबाबत काही प्रश्न / सूचना असल्यास आपण ecoagropune@gmail.com या ई-मेलच्या माध्यमातून आम्हाला पाठवू शकता. 

Comments