मातीचा पोत (लेख क्रमांक १३)

श्री रवींद्र थत्ते, 
संचालक,
इको ऍग्रो ग्रुप, पुणे.

वाळू, पोयटा व चिकणमाती यांच्या कणांपासून माती बनते. या कणांचे गुणधर्म व आकार मध्ये खूप फरक असतो. (खालील तक्ता पाहावा)

मातीच्या कणाचा प्रकार 

आकारमान (व्यास मिमी. मध्ये) 

जाड वाळू 

·२ ते २·०० 

बारीक वाळू 

·०२ ते ०·२० 

पोयटा किंवा गाळ 

·००२ ते ०·०२ 

चिकणमाती 

·००२ पेक्षा कमी 

वरील चार घटक यांचे जमीनीतल्या प्रमाणानुसार जमीनीचा पोत ठरवला जातो. महाराष्ट्रामध्ये बहुतांश जमीनीं मध्ये चिकणमातीचे प्रमाण जास्ती असते व त्या मध्यम ते भारी जमीनी आहेत. प्रत्येक शेतकऱ्याने किमान एक वेळा जमीनीचे भौतिक गुणधर्म ज्यामध्ये जमीनीचा पोत, Bulk Density, मातीतील पोकळ्याचे प्रमाण, पाणी मुरण्याचा वेग, पाणी धारण करण्याची क्षमता समजून घेण्यासाठी मातीची तपासणी अवश्य करावी.

जमीनीचा पोत बदलता येत नसला तरी जमीनीची सुधारणा निश्चित करता येते.

जास्त चिकणमाती असलेल्या जमीनीचे गुणधर्म.

वैशिष्ठ्ये

उणीवा

अन्नद्र्व्यांना धरून ठेवतात म्हणून माती सुपीक.

बारीक कण एकमेकांच्या खूप जवळ असल्यामुळे मुळांच्या कक्षेमध्ये कमी हवा उपलब्ध.

सेंद्रिय पदार्थाने त्यांच्यात सुधारणा सहज घडून येते.

पाण्याचा निचरा लगेच होत नाही.

पाणी धारण करण्याची उच्च क्षमता.

ओले झाल्यावर खूप चिकट होतात, मशागत करणे अवघड होते.

कणांचा आकार खूप लहान असल्यामुळे  त्यांचे पृष्ठभागीय क्षेत्र जास्त असते व  एकूण पोकळ्यांचे प्रमाण जास्त.

माती कोरडी झाली कि कठीण बनते.

 

मातीचा रंग:

तपशील

मातीचा रंग

सेंद्रिय पदार्थ अधिक प्रमाणात

गडद काळा रंग

लोहाच्या प्रमाण नुसार

तांबूस, पिवळसर, तपकिरी रंग

धूप झालेली जमीन

भुरकट पांढरा किंवा करडा

जास्त क्षार असलेली जमीन

पांढरट भुरकट

पाण्याचा निचरा योग्य होत नसेल तर

पृष्ठभागावरील मातीचा रंग तांबडा अगर लाल आणि खालील थरांचा रंग भुरकट पिवळसर

 बल्क डेन्सिटी:

मातीच्या ठराविक आकारमानामध्ये (उदा: लिटर) मावणाऱ्या कोरड्या (शुष्क) मातीचे वजन. या आकारमानामध्ये मध्ये घन पदार्थ, व त्याच्या कणांमधील पोकळ्या (हवा) समाविष्ट असते.

माती ज्या मूळ पदार्थांपासून बनलेली आहे त्यानुसार त्याची घनता कमी जास्ती असू शकते. व सहाजिकच सेंद्रिय पदार्थ भरपूर असलेल्या जमीनीची घनता कमी असते.

जास्त घनता असलेल्या मातीमध्ये मुळांची वाढ चांगली होऊ शकत नाही. तसेच पाणी मुरण्याचा वेग कमी राहतो व वायू विजन सुद्धा नीट होऊ शकत नाही. ओल्या जमीनीवरती अवजड अवजारे वापरल्याने जमीन घट्ट बनते.

बल्क डेन्सिटी चे महत्व हे जमीनीतील मुळांची कक्षेतील वरच्या ६ इंच मातीचे वजन काढण्यास उपयुक्त ठरते. किंवा ओळीत लावलेल्या पिकाच्या कक्षेतील मातीचे प्रमाण काढण्यासाठी करता येतो. समजा तुम्हाला १% प्रमाणात एखादे रसायन जमीनीत मिसळायचे असेल तर याचा उपयोग होतो.

उदा: १ हेक्टर = १०,०००  चौ.मी. X १५ सें. मी. खोली (०.१५ मी.) = १५०० घन.मी.

मातीची घनता = (समजा १.३ किलो/ लिटर), (५०% चिकण मातीचे प्रमाण असलेली सर्व साधारण जमीन गृहीत धरलेली आहे.) म्हणून, १५०० घन.मी. X १.३ किलो/ लिटर = १९५० टन प्रती हेक्टर (७८० टन प्रती एकर)

म्हणून १% रसायन हे १५ सें मी. वरील मातीवरती ७.८० टन प्रती एकर या प्रमाणात मिसळावे लागेल. म्हणून १% ने सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी जमीनीमध्ये ७.८ टन X १.७२ = १३.४१६ टन कोरडा सेंद्रिय पदार्थ वापरावा लागेल. (सेंद्रिय पदार्थाचे सेंद्रिय कर्बात रुपांतर करण्यासाठी वापरलेला घटक १.७२ आहे). 

 मातीच्या कणांतील पोकळ्या

जमीनीतील सच्छिद्रता शेतीसाठी फार महत्वाची असते. मुळांना व सजीवांना प्राणवायू मिळण्यासाठी व मुळे व सूक्ष्म जीवांच्या श्वसनाद्वारे निर्मित कर्ब वायू हवेत जाण्यासाठी जमीन सच्छिद्र असणे गरजेचे आहे. मुळांची वाढ होणे यासाठी पोकळ्या महत्वाच्या आहेत. पोकळ्यांमध्ये सूक्ष्म जीवांचा अधिवास असल्यामुळे त्यांचे कार्य अबाधित चालण्यासाठी जमीन सच्छिद्र असली पाहिजे. मातीमध्ये वेगवेगळ्या आकाराच्या पोकळ्या असतात व यातील लहान आकाराच्या पोकळ्यांमध्ये (०.०३ - ०.०००५ मिमी) पाणी धरून ठेवले जाते. मोठ्या पोकळ्यादेखील महत्वाच्या आहेत कारण त्यांच्या मधून पाण्याचा निचरा होऊन भू-पृष्ठाखालील भागामध्ये जल भरण व साठा होतो.

जमीनीतील पोकळ्या या जमीनीच्या पोताशी संबंधित आहेत. जमीनीमध्ये पाणी मुरण्याचा वेग, जमीनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता या सारख्या महत्वाच्या बाबी त्यावर अवलंबून असतात.

सच्छिद्रतेचे प्रमाण काढण्यासाठी माती ओव्हन (भट्टी) मध्ये १०५ सेंटीग्रेड ला २४ तास तापवून त्यातला पाण्याचा अंश काढून टाकला जातो. हे ग्रॅम प्रति घन सेंमी या स्वरुपात निव्वळ मातीच्या कणांचे वजन असते (particle density). जमीनीतील सच्छिद्रता ४०% -६०% असेल तर ती उत्तम समजली जाते.

पाणी मुरण्याचा वेग

मातीच्या भौतिक गुणधर्मा पैकी जमीनीतील पाणी मुरण्याचा वेग हा अत्यंत महत्वाचे आहे. ज्या जमीनीमध्ये चिकण मातीचे प्रमाण जास्त आहे त्या ठिकाणी जमीनीमध्ये पाणी मुरण्याचा वेग वालुकामय जमीनीपेक्षा कमी असतो. समजा पाणी मुरण्याचा वेग १५ मिलीमीटर प्रती तास असेल तर तेवढे पाणी स्वीकारायला जमीनीला १ तास लागेल. जर ३० मिलीमीटर पाऊस झाला असेल तर तर तेवढे पाणी स्वीकारायला जमीनीला २ तास लागतील.  जेव्हा पाऊस पडण्याचा वेग जमीनीत पाणी मुरण्याच्या वेगापेक्षा जास्ती असतो तेव्हा पडणारे पाणी पृष्ठभागावरून वाहून जाते. यामुळे एकतर पिकाला पाणी उपलब्ध होत नाही, भूजल पातळी वाढत नाही व दुसरे म्हणजे वाहणारे पाणी मातीच्या वरच्या थरातील मातीचे कण, दिलेले खत घेवून वाहून जाते व नुकसान करते.

जमीनीमध्ये पाणी मुरण्याचा वेग वाढवण्यासाठी:

  • आच्छादन पिकांचा वापर, पूर्वीच्या पिकांचे अवशेष राहू देणे.
  • सेंद्रिय पदार्थांचा वापर.
  • कमीत कमी किंवा शून्य मशागत.

जमीनीत पाणी मुरण्याचा वेग हा जमीनीची सच्छिद्रता कमी असणे, क्षारतेमुळे तयार झालेला कठीण थर, घट्ट झालेली जमीन यामुळे कमी होतो. शिवाय, जमीन पाण्याने आधीच संपृक्त असेल तर अधिक पाणी मुरु शकणार नाही.

जमीनीत पाणी मुरण्याचा वेग वाढवण्यासाठी सच्छिद्रता अत्यंत महत्वाची आहे. चोपण / खारवट /कठीण झालेल्या जमीनीची सुधारणा करण्यासठी पाण्याचा निचरा (drainage) होतो का? याकडे प्रथम लक्ष द्यावे लागेल. उताराप्रमाणे जमीनीमध्ये सच्छिद्र पाईप टाकून निचऱ्याची व्यवस्था केली व त्यांनतर भू-सुधाकांचा वापर केला तरच मातीचे कठीण थर/क्षारता कमी होवू शकते व पाणी मुरण्याचा वेग वाढू शकतो. याशिवाय भरपूर सेंद्रिय पदार्थांचा + गरजेप्रमाणे भूसुधाराकांचा वापर केल्यास जमीनीची सच्छिद्रता वाढते. जमीनीवरून चालणारी जड कृषी अवजारे, जनावरे यांनी सुद्धा मातीचा थर कडक बनतो.

जमीनीत पाणी मुरण्याचा वेग वालूकाय जमीनीत सर्वाधिक असून चिकण माती मध्ये तो खूप कमी असतो. चिकण मातीचे प्रमाण जेवढे जास्त तेवढा त्याचा वेग कमी असतो.

सदर लेखमालेतील लेख आवडला असल्यास इतरांना या लेखाची लिंक पुढे पाठवा तसेच या ब्लॉगला फॉलो (Follow) करा. Follow करण्यासाठी https://ecoagroservices.blogspot.com/ या लिंकला जा व पान उघडा. पानाच्या खालच्या उजव्या कोपऱ्यात  या चौकटीवर क्लिक आहे त्यावर क्लिक करा.  नवीन लेख प्रकाशित होताच त्याची सूचना तुम्हाला ई-मेल द्वारे प्राप्त होइल

लेखाबाबत काही प्रश्न / सूचना असल्यास आपण ecoagropune@gmail.com या ई-मेलच्या माध्यमातून आम्हाला पाठवू शकता.  

Comments