फर्टिगेशन (लेख क्रमांक १७)

श्री रवींद्र थत्ते,
संचालक, 
इको ऍग्रो ग्रुप, पुणे.

फर्टिगेशनची उद्दीष्टे:

  • योग्य प्रमाणात पाणी व खतांचा वापर करून जास्तीत जास्त उत्पादन घेणे.
  • खते आणि इतर रसायनांचा निचरा थांबवून प्रतिकूल पर्यावरणीय प्रभाव कमी करणे. 

फायदे:

  • तुलनेने एकसमान खतांचा प्रयोग
  • सोयीनुसार खते देता येतात.
  • कमी खते वापरावी लागतात.
  • पीक वाढीच्या अवस्थेनुसार व जमिनीचा अन्नद्रव्य पुरवठा करण्याच्या क्षमतेप्रमाणे नत्र, स्फुरद, पालाश चे योग्य गुणोत्तर असलेले खत देता येते.
  • खतांचे स्थिरीकरण, निचरा कमी होऊन खतांचा कार्यक्षम वापर होतो.
  • कमी सामुची विद्राव्य खते वापरल्यामुळे मुळांच्या कक्षेमध्ये आम्ल सामुचे द्रावण उपलब्ध होते. व खताची उपलब्धता वाढते.
  • क्षारता न वाढू देता खत उपलब्ध करता येते, त्यामुळे अन्नद्रव्य उचलण्यास जास्त शक्ती खर्च होत नाही.
  • मुळांभवती वाफसा स्थिती राखता येते त्यामुळे हवा व पाणी यांचा योग्य समतोल साधला जातो व अन्नद्रव्ये उपलब्धता वाढते.   

खालील घटकांचा पीक अन्नद्रव्यांवर प्रभाव पडतो.

  • रासायनिक घटक: सामू,  क्षारता, विद्युत वाहकता (ईसी) यांवर खतांची कार्यक्षमता अवलंबून असते. 
  • खत विश्लेषण: प्रमुख/दुय्यम पीक अन्नद्रव्य (मॅक्रोन्यूट्रिएंट्स), सूक्ष्म अन्नद्रव्य (मायक्रोन्यूट्रिएंट्स)
  • सोडियम, क्लोरिनच्या अती मात्रेमुळे होणारे संभाव्य दुष्परिणाम.

मातीच्या अयोग्य सामुशी (पीएच) संबंधित समस्या:

सामू कमी असताना:

  • लोह, मॅंगनीज, जस्त, तांबे: या अन्नद्रव्यांचे प्रमाण जास्त असेल तर पिकावर हानिकारक परिणाम होतो.
  • कॅल्शियम, मॅग्नेशियम: या अन्नद्रव्यांची कमतरता आढळते.
  • अमोनियमनत्राची उपलब्धता पिकासाठी संवेदनशील ठरते.

सामू जास्त असताना:

  • लोह, मॅंगनीज, जस्त, तांबे, बोरॉन: या अन्नद्रव्यांची कमतरता आढळते. 

काटेकोर सम प्रमाणात खात देणे अपेक्षित असेल तर:

  • उतार असल्यास प्रेशर कॉम्पेनसेटिंग ड्रीपर बसवले पाहिजेत.   
  • योग्य प्रकारचे फिल्टर बसवणे व ते साफ ठेवणे.
  • मुळांच्या विस्ताराप्रमाणे ड्रीपरचा विसर्ग व ड्रीपरच्या नळ्यांचे योग्य अंतर ठेवावे.
  • ड्रीप लाईन व ड्रीपर साफ ठेवण्यासाठी वारंवार ॲसिड व क्लोरीनची प्रक्रिया करणे गरजेचे आहे. व एन्ड कॅप मधून फ्लश करणे देखील गरजेचे आहे.
  • वेगवेगळ्या ठिकाणच्या ड्रीपर मधून प्रत्यक्ष बाहेर पडणारे पाणी मोजून खात्री करायला पाहिजे.
  • मातीचे भौतिक गुणधर्म व पाण्याचे रासायनिक गुणधर्म कळण्यासाठी माती व पाणी परीक्षण अवश्य करावे.
  • जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता, मुळांची वाढ व बाष्पउत्सर्जन चा विचार करून योग्य तितकेच पाणी द्यावे. सदर तिन्ही मुद्दे हे वैयक्तिक असल्याने इतर कोणी किती व कसे पाणी देतो ह्याचा विचार करू नये.
  • बाष्पउत्सर्जन, जमिनीतील पिकाला उपलब्ध पाणी, पाणी घेण्यासाठी लागणारी उर्जा या बाबी तसेच जमिनीचे तापमान, क्षारता याबाबत जमिनीतील व्यवस्थापकीय माहिती शेतकऱ्याला पुरवणारे सेन्सर युक्त वेदर स्टेशन आता उपलब्ध आहेत. त्यांचा वापर केला तर जमीन जास्तीत जास्त वाफसा स्थितीत ठेवून उत्तम फायदा मिळू शकतो.
  • स्वयंचलित विद्युत वाहकता व सामू तपासणारी यंत्रणा बसवणे फायदेशीर आहे.  

विद्राव्य खतांचा वापर करताना कोणते खत किती प्रमाणात वापरले तर पाण्याचा सामू व क्षारता किती होईल हे दर्शवणारा तक्ता:


विद्राव्यता: अनेक वेळा शेतकरी विद्राव्य खते ठिबक मधून वापरताना विद्राव्यता बाबत संभ्रम होतो. वर दिलेल्या तक्त्या मध्ये २० डिग्री सेंटीग्रेड असताना कोणते खत किती ग्रॅम/लिटर पाण्यामध्ये विरघळू शकते हे दर्शवले आहे. यापेक्षा जास्ती खत अथवा कमी पाणी वापरले तर काही खत पाण्यात विरघळणार नाही. विशेषत: थंडीमध्ये जेव्हा पाण्याचे तापमान १० अथवा त्यापेक्षा कमी होईल त्यावेळेला पूर्वीच्या प्रमाणात (२० डिग्री सेंटीग्रेड प्रमाणे) ते विरघळणार नाही.

ठिबक मधून खत देताना ते सम प्रमाणात व योग्य त्या सामूचे असावे या कडे लक्ष देणे गरजेचे आहे अन्यथा फर्टीगेशन तंत्राचा पूर्ण फायदा, व अपेक्षित उत्पादन वाढ मिळू शकणार नाही.

सदर लेखमालेतील लेख आवडला असल्यास इतरांना या लेखाची लिंक पुढे पाठवा तसेच या ब्लॉगला फॉलो (Follow) करा. Follow करण्यासाठी https://ecoagroservices.blogspot.com/ या लिंकला जा व पान उघडा. पानाच्या खालच्या उजव्या कोपऱ्यात  या चौकटीवर क्लिक आहे त्यावर क्लिक करा.  नवीन लेख प्रकाशित होताच त्याची सूचना तुम्हाला ई-मेल द्वारे प्राप्त होइल

लेखाबाबत काही प्रश्न / सूचना असल्यास आपण ecoagropune@gmail.com या ई-मेलच्या माध्यमातून आम्हाला पाठवू शकता. 

Comments