जगाची लोकसंख्या, जमिनीचा वापर, अन्नधान्य सुरक्षा या संदर्भात कमी खर्चाची सेंद्रिय शेती. (लेख क्रमांक १९)

 श्री रवींद्र थत्ते, 
संचालक, 
इको ऍग्रो ग्रुप, पुणे.

मागील ८० वर्षामध्ये शेती पद्धतीमध्ये खूप बदल घडून आले. सिंचन, रासायनिक खत,  तण/बुरशी/कीटक नाशकेसंकरीत बियाणांचा वापर हीच आता प्रचलित पद्धत समजली जाते. या शेती पद्धती मध्ये खूप संशोधन झाले असून हेच तंत्रज्ञान शेतकऱ्यांना उपलब्ध आहे. परंतु आता या पद्धतीने कोणाचेच समाधान होत नाही असे दिसते. वाढणारा उत्पादन खर्च, घटणारा नफा, खराब होणारी जमीन या समस्या शेतकऱ्याला भेडसावतात तर निकस, विषारी अंश असणाऱ्या अन्नामुळे ग्राहक धास्तावलेल्या अशी परिस्थिती आहे.

पूर्वीप्रमाणे, कोणीतरी शेती केलीच पाहिजे असे आजचे तरुण माननाहीत. शेती करणे हि परंपरा, पेशा, मातीची सेवा, यापेक्षा अर्थार्जनासाठी निवडलेला व्यवसाय आहे हे शेतकऱ्याच्या आता लक्षात येते आहे. मिळकतीपेक्षा खर्च जास्ती असे जेव्हा होते, तेव्हा सर्व प्रथम खर्च कमी करणे गरजेचे असते. प्रचलित पद्धतीने शेती करणारे बहुतेक शेतकरी दुष्टचक्रात सापडल्यामुळे, नक्की काय करावे ? तो निर्णय योग्य ठरेल का ? अशा भीतीमुळे शेतकरी सहसा बदल करत नाही.  

प्रचलित शेती पद्धत हि तीन महत्वाच्या मुद्द्यांबाबत उपयुक्त आहे का हे बघणे गरजेचे आहे.  

  • जगाच्या वाढत्या लोकसंख्येला अन्न पुरवठा करू शकते का ?. (अन्न सुरक्षा)
  • भविष्यासाठी कार्यक्षम, पर्यावरण पूरक, शाश्वत व योग्य आहे का ?. (शाश्वतता).
  • मजुरांची उपलब्धता कमी असल्यामुळे शेती करण्यासाठी यंत्राचा वापर करावाच लागेल का?. (यांत्रिकीकरण).

वरील मुद्द्ये नीट समजून, त्यातील सत्यता पडताळून, विचारपूर्वक पुढील वाटचाल करणे गरजेचे आहे. तसेच काही गैर-समज दूर होणे हि महत्वाचे आहे. 

जगाच्या लोकसंख्येचा आलेख:


सन २०५० पर्यंत जगाची लोकसंख्या ९५० ते १००० कोटी इतकी वाढेल असे शास्त्रज्ञांना वाटते व त्यावेळेच्या लोकसंख्येला पुरेल एवढे अन्नधान्य निर्मितीसाठी, २०१० पेक्षा ५६% अधिक उत्पादन होणे गरजेचे आहे. अर्थातच, नवीन जमीन लागवडीखाली आणणे हे फारसे शक्य नाही व त्यामुळे बियाण्यांमध्ये जनुकीय सुधारणा करणे, शास्त्रशुद्ध काटेकोर पद्धतीने खते, पाण्याचा कार्यक्षम वापर करून उत्पादकता वाढवणे यासारखे पर्याय उपलब्ध आहेत.

मात्र, काही शास्त्रज्ञांना, लोकसंख्या वाढ व भविष्यातील अन्नधान्य टंचाई हि भीती अनाठाई / चूक वाटते तसेच हा प्रचार बियाणे, खते, औषधे, व शेती व्यवसायाशी निगडीत व्यवसाय वृद्धीसाठी केला आहे असा ठाम समज आहे. याचे कारण २०५० ला लागेल एवढे अन्नधान्य आतासुद्धा आपण निर्माण करत आहोत, परंतु त्यातील ३०% ते ४०%, एवढे अन्नधान्य वाया जाते. तसेच, जगातील ८० कोटी भुकेल्या माणसांना अन्न असूनसुद्धा, आर्थिक विषमतेमुळे अन्न मिळत नाही. 

इतिहास काळापासून जगातील शेत जमिनीचा वापर:


औद्योगिक शेती:

इथेनॉल निर्मिती साठी मका किंवा साखर उद्योगासाठी ऊस / बीट लागवड केली जाते. याशिवाय थेट खाद्य पदार्थ बनवण्यासाठी केलेली लागवड जसे केचपसाठी टोमॅटो, साबुदाण्यासाठी कसावा, वेफरसाठी बटाटा, वाईनसाठी द्राक्षे, अत्तर-गुलकंद यासाठी फुलांची लागवड, चॉकलेटसाठी कोको व चहा-कॉफी व मसाला पिकांची लागवड इत्यादी. भारतामध्ये अशा प्रकारची शेती लहान शेतकरी करत असले तरी जगात अनेक ठिकाणी उद्योगाप्रमाणे खूप मोठ्या क्षेत्रावर हि शेती केली जाते व अन्न सुरक्षेसाठी अशा शेतीचा कोणताही उपयोग नाही.

व्यापक औद्योगिक / यांत्रिक पद्धतीने केलेल्या शेतीमध्ये रासायनिक खते, कृषी रसायने (कीटक नाशके), संकरीत बि-बियाणांचा अधिक वापर होतो व चांगले उत्पादन हि घेतले जाते. तरी देखील व्यापक शेतीच्या तुलनेत लहान शेतकरी अधिक अन्नधान्य उत्पादन करतात व त्यांच्यापेक्षा अधिक कार्यक्षम असतात. औद्योगिक शेतीमध्ये गहू, बटाटा, मका, ऊस यासारख्या पिकांची शेती केली जाते तर लहान शेतकरी धान्यासोबत अनेक प्रकारची पालेभाज्या-फळभाज्या, फळे उत्पादन व विक्री करतात. म्हणजेच खर्चायला पैसे नसले तरीही बहुतांश अल्प भूधारक व लहान शेतकरी अन्नाच्या बाबतीत स्वयंपूर्ण असतात.  

अन्न सुरक्षा:

जागतिक खाद्य व कृषी संस्था (FAO) च्या अहवालानुसार जगातील एकूण शेतजमिनी पैकी १/३ शेत जमीन हि अल्प भू-धारकांची (२.५ एकर) आहे व हे शेतकरी स्वतःच्या कुटुंबाला पोसण्यासाठी अन्नधान्याचे उत्पादन करतात. जगभरातील भांडवलाचा अभाव असलेले अल्प भूधारक शेतकरी व जगातील १/३ लोकसंख्या असलेल्या लोकांची अन्न सुरक्षा हि चिंता नाही, कारण ते स्वतःपुरते तसेच विक्रीसाठी सुद्धा उत्पादन घेतात. वस्तुत: अनेक देशांमध्ये अन्न धान्य टंचाई नसून धान्य विकत घेण्याची कुवत नसणे हि समस्या आहे. या उलट, अमेरिकेत जेमतेम ३% लोकं शेती करत असून अमेरिकेतील ९०% शेतमाल समृद्ध व प्रगत देशांमध्ये निर्यात होऊन वापरला जातो.

इतर कोणत्याही व्यवसायापेक्षा अधिक जोखीम शेतकऱ्याला घ्यावी लागते. तसेच या व्यवसायात स्वतःच्या मालाची किंमत ठरवता येत नाही. कोणत्याही देशामधील शेतकरी, शेतीमध्ये खूप नफा मिळतो असे म्हणू शकत नाही. राज्य शासने, विद्यापीठे शेतकऱ्यांनी अधिक धान्य पिकवावे असे सुचवतात, परंतु शेतकऱ्याने किफायतशीर परवडणारी शेती करावी, हे मात्र कोणी सांगत नाही. जर सर्वांना अन्न आवशयक आहे, तर ग्राहकाने त्यासाठी योग्य भाव मोजायला काय हरकत आहे? 

शाश्वतता:

रासायनिक खते, कीटक/बुरशी/तण नाशके यांच्या वापराने जमीन तसेच मानव आणि पर्यावरणावरती तत्कालीन आणि दीर्घकाळ दुष्परिणाम होतो हि बाब आता निर्विवाद आहे. जमीन हि शेतकऱ्याची संपत्ती व उपजीविकतेचे एकमेव साधन आहे. जोपर्यंत मनुष्याला अन्नाची गरज राहणार आहे, तोपर्यंत तिचा उपयोग अन्न पिकवण्यासाठी करणे अपेक्षित आहे. यासाठी जमीनीची उत्पादकता व जमीनीचे आरोग्य टिकून राहणे गरजेचे आहे. महाराष्ट्रामध्ये 2.८ लाख हेक्टर जमीनिवर सेंद्रिय पद्धीताने पिक घेतली जाते. (सन २०१९-२०)

सेंद्रिय शेती हि नैसर्गिकरित्या शाश्वत असते असा एक गैरसमज रूढ आहे. मोठ्या नद्यांच्या काठी वसलेल्या प्राचीन संस्कृत्या नष्ट होण्याचे प्रमुख कारण जमिनीची धूप व तिच्या आरोग्याची अधोगती हेच होते. त्याठिकाणाची शेती सेंद्रिय असूनही शाश्वत ठरली नाही. म्हणजेच, सेंद्रिय शेती करतानासुद्धा जमीनीच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करून चालत नाही. 

यांत्रिकीकरण:

पारंपारिक पीक पद्तीमध्ये मजूर व जनावरांकडून मशागत, पेरणी, कापणी, मळणी इत्यादी कामे केली जायची. आधुनिक शेतीमध्ये हि कामे यंत्रांद्वारे केली जातात. परंतु सिंचनामुळे, वारंवार मशागतीमुळे, खोल पलटी नांगरट केल्यामुळे, अवजड यंत्राच्या वापरामुळे जमीन घट्ट होणे, मातीची रचना बदलणे, हे प्रमुख दुष्परिणाम दिसून येतात. घट्ट झालेल्या जमीनीचे थर फोडून मऊ करण्यासाठी परत सब सॉइलिंग सारखी मशागत करावी लागते. दुसरे पीक त्वरित पेरण्याच्या दृष्टिकोनातून धसकट व काडाचे सेंद्रिय पदार्थांमध्ये रुपांतर करण्याऐवजी ती जाळून टाकून प्रदूषणाची मोठी समस्या निर्माण केली जाते. यामध्ये जमिनीची, पर्यावरणाची व माणसाच्या आरोग्याची मोठी हानी होत आहे. 

संवर्धित शेती / शून्य मशागत शेती, सेंद्रिय शेती : सुरुवात व वाटचाल.

कमी मशागत/ शून्य मशागत याचा वापर अमेरिकेत व इतर अनेक देशांमध्ये सुमारे ४५ वर्षापासून वाढू लागला. प्रचलित शेतीमधील दुष्परिणामांना पर्याय म्हणून सेंद्रिय, शाश्वत, पुनरुत्पादित, अन्नद्रव्यांची अधिक घनता असेलेले सुरक्षित अन्न तयार करण्याच्या विचारांनी काही लोकांनी परिवर्तन करण्यास सुरुवात केली. प्रकाशित शास्त्रोक्त माहिती व तज्ञ मार्गदर्शक यांच्या अभावामुळे अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागले व नुकसान पण सोसावे लागले. मात्र सूक्ष्म निरीक्षण करून होणाऱ्या परिणामाची मोजदाद व टीपण ठेवण्याच्या सवयीमुळे, शास्त्र विकसित होत गेले. हळू हळू अधिक लोकं त्याचा स्वीकार करू लागले. आच्छादन पिकांचा वापर करताना कोणत्या वनस्पती, किती किलो प्रती एकर वापराव्या, कशा पेराव्या,  इत्यादी बाबत माहिती प्रयोगातूनच मिळत गेली. जमिनीच्या स्वास्थासाठी संशोधन करणाऱ्या सूक्ष्मजीव शास्त्र , कृषिविद्या शास्त्र, मृदा शास्त्र इत्यादी शास्त्रज्ञांकडून या ज्ञानात भार पडत गेली व हळू हळू शास्त्र विकसित होत गेले. याशिवाय पूरक व अत्यावश्यक सेवा (जसे योग्य प्रकारे माती परीक्षण, निरनिराळ्या आच्छादन वनस्पतींचे बियाणे उपलब्ध करणाऱ्या कंपन्या, मशागत न करता बियाणे टोकणारी यंत्रे व उच्च शिक्षित तसेच प्रशिक्षित सल्लागारांचे मार्गदर्शन, कार्यशाळा इत्यादी) उपलब्ध होत गेल्या. भारतात मात्र शाश्वत पुनरुत्पादनक्षम सेंद्रिय शेतीबाबत शास्त्र अजून  विकसित होत असून शास्त्रशुद्ध मार्गदर्शन फार कमी शेतकऱ्यांना मिळते.

कमी श्रमात व कमी खर्चामध्ये चांगल्या प्रकारे उत्पादन मिळू शकते, अधिक आर्थिक फायदा होतो. त्याशिवाय जमिन, पर्यावरणाचा फायदा म्हणून लाखो एकर वर अशा प्रकारची शेती आता केली जाते.  

सेंद्रिय व प्रचलित शेती पद्धतीमधील उत्पादनातील फरक: 

सन २०१५ मध्ये प्रचलित शेती व सेंद्रिय शेती पद्धत यामधील उत्पादनातील फरका बाबत विविध ११५ ठिकाणी केलेल्या शास्त्रीय प्रयोगांचा अभ्यास केला गेला. त्यामध्ये असे दिसून आले कि सेंद्रिय उत्पादन पद्धतीपेक्षा प्रचलित उत्पादन २०% ने अधिक होते. एका उप-अभ्यासामध्ये असे दिसून आले कि सेंद्रिय शेती सोबत आच्छादन पिकांचा वापर व ज्या जमिनीमध्ये जमीनीचे आरोग्य सुधारण्यासाठी पिकांची फेरपालट केली होती, अशा ठिकाणी उत्पादनातील फरक फक्त १०% होता. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते कि सेंद्रिय शेती आताच्या व भविष्यात वाढणाऱ्या लोकसंख्येला अन्न पुरवठा करू शकत नाहीत असे नाही. शेतीमधील खर्च खूप कमी झाल्यामुळे खर्च:फायदा याचे गुणोत्तर पुष्कळ सुधारते. 

आधुनिक शेती पद्धती (वैशिष्ठ्ये):

  • सर्वाधिक उत्पादक्ता दिसून येते.  
  • जास्त उत्पादन देणाऱ्या संकरीत / बीटी जातींचा वापर व जुन्या पारंपारिक वाणांचा त्याग.
  • जैव विविधता नाही. (एक पीक पद्धती).
  • जमीनीची जास्त मशागत आवश्यक.
  • जमीनीला सिंचन व भरपूर रासायनिक खते, सूक्ष्म अन्नद्रव्ये द्यावी लागतात.
  • तण-कीड-रोग नियंत्रण आवश्यक व त्यावर मोठा खर्च.
  • बियाणे व्यवसाय - ठराविक कंपन्यांची मक्तेदारी.
  • काही वर्षांनी उत्पादकता कमी होते.
  • पर्यावरण, जमीन व मानवी स्वास्थ्यासाठी हानीकारक. 

शाश्वत शेती (वैशिष्ठ्ये):

  • मशागतीचा खर्च नाही, आच्छादन पिके तसेच जैव-विविधता असल्यामुळे पाणी मुरण्याचा वेग व पाणी धरून ठेवण्याच्या क्षमतेमध्ये वाढ, त्यामुळे अवर्षण प्रवण क्षेत्रामधील  कोरडवाहू शेती सुद्धा शक्य.
  • स्वतःचे / स्थानिक बियाणांचा वापर, तसेच रासायनिक खते, सूक्ष्म अन्नद्रव्ये वरील खर्च अत्यंत कमी किंवा शून्य त्यामुळे आर्थिकदृष्टया फायदेशीर.
  • उर्जेचा कार्यक्षम वापर.
  • जमीनीची प्रत, दर्जा आणि स्वास्थ राखले जाते व त्यात सुधारणाहि होते.
  • पर्यावरण, जमीन व मानवी स्वास्थ्यासाठी लाभदायक. 

एक गोष्ट सहज पटेल कि निसर्गामध्ये वनस्पतीची वाढ हि नैसर्गिक घटना असून कोणत्याही निविष्ठांचा वापर न करता अन्नधान्य उत्पादन हजारो वर्ष चालू आहे. वनस्पती त्यांना आवश्यक पीक पोषक तत्वे मिळवण्यासाठी जिवाणूंसोबत सहयोगी पद्धतीने कार्य करतात व निसर्गात वाढताना त्यांना कोणतीही कमतरता भासत नाही. तसेच कीड/रोग यांचा मुकाबला करण्याचे सामर्थ्य देखील सूक्ष्मजीव त्यांना पुरवतात. निसर्गाचा अभ्यास केला व अनुकरण केले तर सेंद्रिय / शाश्वत / शून्य मशागत / नैसर्गिक शेती शक्य आहे.

अत्यंत कमी खर्चामध्ये चविष्ट, पौष्टीक, सेंद्रिय धान्य / भाजीपाला निर्मिती शक्य आहे व त्याच्यासाठी मानवी शरीर स्वास्थाला महत्व देणारे ग्राहक शोधले, तर प्रचलित पेक्षा अधिक बाजारभाव मिळू शकतो. पुनरुज्जीवित सेंद्रिय शेतीचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांनी आत्मसात केले तर निश्चित रूपाने,  कमी खर्चात पुरेसे उत्पादन मिळून त्यांना अधिक आर्थिक लाभ होऊ शकतो. 

सदर लेखमालेतील लेख आवडला असल्यास इतरांना या लेखाची लिंक पुढे पाठवा तसेच या ब्लॉगला फॉलो (Follow) करा. Follow करण्यासाठी https://ecoagroservices.blogspot.com/ या लिंकला जा व पान उघडा. पानाच्या खालच्या उजव्या कोपऱ्यात  या चौकटीवर क्लिक आहे त्यावर क्लिक करा.  नवीन लेख प्रकाशित होताच त्याची सूचना तुम्हाला ई-मेल द्वारे प्राप्त होइल

लेखाबाबत काही प्रश्न / सूचना असल्यास आपण ecoagropune@gmail.com या ई-मेलच्या माध्यमातून आम्हाला पाठवू शकता. 

Comments