एक पीक पद्धतीचे दुष्परिणाम (लेख क्रमांक २१)

 श्री रवींद्र थत्ते, 
संचालक, 
इको ऍग्रो ग्रुप, पुणे.

आज जास्तीत जास्त शेती हि एक पीक पद्धतीने केली जाते. याचे अनेक तोटे व दुष्परिणाम आहेत. याउलट मिश्र पीक पद्धती व आच्छादन पीकांचा वापर करून कमी खर्च, चांगले उत्पादनजमिनीचे आरोग्य असे अनेक फायदे होतात असे दिसून येते.

सुर्यापासून मिळणारी उर्जा (सूर्यप्रकाश) मोफत मिळतो तसेच कर्ब वायू सुद्धा मोफत आहे. म्हणजेच प्रकाश संश्लेषणासाठी वनस्पतीला लागणारे सर्व निविष्ठा मोफत आहेत. शेती व्यवस्था हि ३६५ दिवस सूर्यप्रकाशाचा जास्तीत जास्त वापर करून सर्वाधिक जैव भार तयार करणारी असावी. शेतीच्या अर्थकारणासाठी हि सर्वात महत्वाची बाब आहे.   

स्वच्छ तण विरहीत शेत, काटेकोर ओळींमध्ये ठराविक अंतरावरती पेरलेलं पीक हे चित्र शेतकऱ्याच्या मनावरती जणू कोरले आहे. शिवाय "तण खाई धन", "पिकांना पोषण अन्नद्रव्ये द्यावीच लागतात" व त्याही पुढे जावून त्यांच्या वाढीसाठी लागणारी सूक्ष्म अन्नद्रव्ये, ऑक्सिन्स, सायटोकाईनिन संप्रेरक, जैव उत्तेजक यांचा वापर आवश्यक आहे हा समज रूढ आहे. वनस्पती स्वत:चे अन्न स्वत: बनवते, वाढू शकते व उत्पादनही देऊ शकते याचा आपल्याला विसर पडल्यासारखेच झाले आहे.

आपण आपल्याच परस बागेमध्ये अथवा कोकण, केरळ अशा ठिकाणी बघितले तर अत्यंत दाटीवाटीने खूप झाडे, वेली, भाजीपाल्याची लागवड दिसून येते. तिथे कोणतेही खत, कीटक नाशक इत्यादी न वापरताहि उत्पादन मिळते हे आपण बघितले असेलच.

काही नैसर्गिक परिसंस्थेमध्ये एक हेक्टर मध्ये ५०० ते ७०० विविध वनस्पती आढळून येतात. इतक्या वनस्पती दाटीवाटीने वाढतात, त्यांची मुळे, जमिनीखाली दाट गालीच्या सारखी पसरतात त्यामुळे जमिनीची धूप होत नाही, पावसाचे पाणी मुरते व जमिनीमध्ये थांबते, जमिनीचे तापमान कमी राहते, जमिनीखालील प्राणी उदा: गांडुळे व सूक्ष्म जीव भरपूर काम करू शकतात. या सर्व विविधतेमुळे वनस्पतींची मुळे वेगवेगळ्या थरांमध्ये काम करतात. त्यांच्या राइझोस्फियर मध्ये विशिष्ठ जीवाणू सतात, जे अन्नद्रव्य चक्र सुरळीतपणे चालवतात. ह्या वनस्पती एकमेकांशी स्पर्धा ना करता एकमेकांना पूरक ठरतात.

जीवाण, सूक्ष्म जीव, वनस्पती, कीटक हे सर्व मानवाच्या लाखो वर्ष आधीपासून अस्तित्वात आहेत व एकमेकांवारती अवलंबून पण आहेत. मानवी हस्तक्षेपा पर्यंत निसर्गाचे हे चक्र सुरळीतपणे चालू होते. शेतीच्या १०,००० वर्षाच्या इतिहासामध्ये जवळपास १९ व्या शतकापर्यंत मोठे बदल झाले नाहीत. जनावरांनी ओढलेल्या लाकडी नांगराव्यतिरिक्त अवजारे, मशागत असे काही नव्हते. २० व्या शतकापासून मात्र उच्च उत्पादकता (अधिक पैसे) मिळवण्यासाठी, सिंचनाच्या उपलब्धतेनुसार दुबार, तिबार पीक पद्धती व रासायनिक खतांचा वापर सुरु झाला. त्यानंतर कीटक/तण/बुरशी नाशक यांच्या आगमनाने जहाल विषारी रसायनांचा अनिर्बंध वापर वाढला. यामध्ये अन्नसाखळी मध्ये सर्व जीव (प्राणी व वनस्पती व सूक्ष्म जीव) एकमेकांवर अवलंबून आहेत याचा विसर पडला.

मधमाशी व काही कीटक यांचे वनस्पतीसोबत अतिशय विशिष्ठ व घनिष्ठ नाते आहे. हजारो वनस्पतीं परागीकरणासाठी किटकांवर अवलंबून आहेत. १९११ चे नोबेल पुरस्कार प्राप्त मॉरिस मेटरलिंक यांनी असे नमूद केले होते कि, "मधमाश्यांचा नाश झाल्यावर पृथ्वीवर मनुष्याचे अस्तित्व फक्त ४ वर्ष टिकेल". हे ठाऊक असूनही आपण त्यांचा अधिवास व फुलांची उपलब्धता (खाद्य) याकडे लक्ष देत नाही. इतकेच नव्हे तर मधमाश्यांसाठी हानिकारक कीटक नाशकांचे फवारे देखील करत राहतो.

रासायनिक खतांच्या अति वापरामुळे तसेच इतर कारणामुळे बहुतेक शेत जमिनीत आता गांडूळ, बेडूक हे प्राणी अत्यल्प प्रमाणात दिसतात. पूर्वी भरपूर प्रमाणात आढळणारे पक्षी सुद्धा कमी झाले. जमीन व पर्यावरणाची किती नासाडी झाली आहे हे यावरून ओळखू येते.

सन १९५४ मध्ये अमेरिकतील जाहिरातीचे घोषवाक्य "फक्त मृत किडा हाच चांगला असतो" अशा आशयाचे होते. दुसऱ्या महायुद्धानंतर निर्वासितांच्या कपडयांवरील आणि अंगावरील उवा मारण्यासाठी DDT धुरळली जायची. त्याही पुढे जाऊन जमिनीतील वनस्पती रोग निर्माण करणारे सूक्ष्म जीव मारण्यासाठी मिथिल ब्रोमाइड या जहाल विषारी वायूचा वापर जमिनीचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी केला जायचा. याच्या वापराने जमिनीच्या वरील थरातील सर्व सजीव (सूक्ष्म जीवांसकट) मारले जायचे. बियाणाला चोळण्यासाठी जहाल विषारी पारायुक्त बुरशीनाशके वापरली जायची. काही कीटक नाशके तर इतकी विषारी होती कि काही मिलीग्रॅम (mg) मध्ये सुद्धा मनुष्य मरू शकायचा. या रसायनांची जमीन, हवा, पाणी, व सजीव यांच्यावर होणाऱ्या दुष्परिणामांची माहिती न घेतल्याने / काळजी न केल्यामुळे यासारख्या चुका केल्या झाल्या हि वस्तूस्थिती आहे. हळू हळू या भयानक रसायनांची तीव्रता व दुष्परिणाम लक्षात येऊ लागले व कमी जहाल किटक नाशकांची निर्मिती आता केली जाते. पण ती पूर्णतः निर्धोक असतात असे नाही. उदा: ग्लायफॉसेट हे तणनाशक मुख्य पिकातील तण मारते पण त्याच बरोबर लोह, मॅंगनीज यासारख्या अन्नद्र्व्यांना धरून मुळ पिकामध्ये कमतरता निर्माण करते. व्यावसायिकरित्या प्रबळ कंपन्या, मुलभूत संशोधन करण्याची त्यांची ताकत, लवचिक सरकारी धोरणे इत्यादी मुळे सामान्य शेतकऱ्याला अतिशय महाग अशा कीड/रोग/तण नाशकांना पर्याय नाही असेवाटते.

विशेष म्हणजे यातील अनेक परिणामकारक रसायने हि मूलतः वनस्पती (निम, करंज, झेंडू, शेवंती) व सूक्ष्म जीवांमधील नैसर्गिक घटकांवर आधारित आहेत. उदा: नैसर्गिक पायरीथ्रीन, रोटेनॉन डेरीस, सोफारा (मॅट्रिन) हि वनस्पती आधारित तर अबामेक्टीन, स्ट्रेप्टोमाइसिन, स्पिनोसॅड जिवाणूंवरती आधारित आहेत. याशिवाय काही बुरशीनाशके हि झिंक, मंगल, गंधक, ताम्र या खनिजांवर आधारित आहेत.

लाल त्रिकोणातली जहाल विषारी कीटक नाशकांचे उत्पादन थांबले असले तरी संहार काही थांबलेला नाही. कीड-रोगाच्या नियंत्रणासाठी सर्वेक्षण करून आर्थिक हानीची पातळी गाठल्याशिवाय फवारणी करू नये हे शेतकऱ्यांना शिकवण्याऐवजी वेळापत्रकानुसार विविध कीड/रोग नाशक फवारणीची शिफारस केली जाते. (ईलाजा पेक्षा प्रतिबंध श्रेष्ठ, मात्र पिकावर रोग किंवा कीड आहे का ? हा मुद्दा बाजूलाच राहतो.) परवडत नसले तरी शेतकरी रोज विविध कीड/बुरशी नाशकांचा वापर करत राहतो. सद्य परिस्थितीत शेतीला या रसायनांचा वाढता वापर करण्याशिवाय कोणताही पर्याय नाही असे समजले जाते.

कीड व रोगांचे दमन करण्याची क्षमता वनस्पतींना निसर्गत: आहे. याशिवाय परोपजीवी, परभक्षी कीटकांच्या द्वारे वनस्पतींचे नुकसान करणाऱ्या किडींपासून संरक्षण करण्याची व्यवस्था देखील आहे. सहसा, जैव-विविधता असणाऱ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती कीड–रोगांपासून आर्थिक हानी दिसून येत नाही.   

रासायनिक कीटक/बुरशी नाशक यांच्या वापर टाळणे अथवा कमी करणे शक्य आहे. त्यासाठी नैसर्गिक कीड नियंत्रण, परोपजीवी भक्षक किडींचा वापर, किडे खाणाऱ्या पक्ष्यांना बसायला जागा देणे, सापळा पीक पद्धत अवलंबणे, कीड/रोग मारणाऱ्या जीवाणू/बुरशीचा वापर इत्यादी एकात्मिक कीड नियंत्रण पद्धतीचा वापर करणे गरजेचे आहे. आच्छादन पिके, जैव-विविधता व जमिनीचे आरोग्य म्हणजेच जमिनीमध्ये पुरसे सेंद्रिय कर्ब असेल तर, जिवाणूंमार्फत कीड-रोगाचे दमन व प्रतिबंधात्मक उपाय योजना केल्या जातात.   

निसर्गामधील जैव विविधता हि परस्पर संबंध अथवा अन्न साखळीसाठी महत्वाची असून मनुष्याने इतरांच्या नैसर्गिक अधिवासावर अतीक्रमण केले आहे. दिवसागणिक शेकडो प्रजाती नष्ट होत आहेत. याकडे गांभीर्याने बघितले नाही तर प्रचलित शेती पद्धती शक्य होणार नाही व मनुष्याला हरित गृह सारख्या कृत्रिम वातावरणामध्ये अन्न पिकवावे लागेल.   

एके काळी भारतामध्ये स्थानिक भाताच्या अंदाजे १ लाख जाती होत्या. आता जेमतेम १०० संकरीत जातींचा वापर केला जातो. स्थानिक जाती मध्ये खूप विविधता व प्रतिकार क्षमता होती. कमी खर्चाच्या नैसर्गिक शेती पद्धती / सेंद्रिय शेतीमध्ये आज देखील त्या पुरेसे उत्पादन देऊ शकतात. ग्राहकांना विविधता, नैसर्गिक चव, खनिजे व अन्नद्र्व्यांनी भरपूर, रासायनीक अवशेष नसलेले धान्य, फळ व भाज्या हवे आहेत, व त्यासाठी ते पैसे मोजायला पण तयार आहेत.

शरीर स्वस्थासाठी पारंपरिक नाचणी, शाळू, दादर, जीरगा / घनसाळ भात, खपली गहू, राजगिरा, पिवळा मुग, इत्यादीचा खप वाढतो आहे. उत्तम पॅकिंग व मार्केटींगच्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत पोहचण्याची पद्धत अवलंबली तर सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या वैशिष्ठपूर्ण स्थानिक वाणांना उत्तम भाव मिळतो व त्यामुळे कमी उत्पादन मिळाले तरी अधिक फायदा होतो.

बदल करायचा कि नाही हा अर्थातच व्यक्तीगत निर्णय आहे. मात्र कमी खर्चात अधिक नफा हा मुद्दा देखील बदल करण्याच्या निर्णयासाठी पुरेसा आहे.

सदर लेखमालेतील लेख आवडला असल्यास इतरांना या लेखाची लिंक पुढे पाठवा तसेच या ब्लॉगला फॉलो (Follow) करा. Follow करण्यासाठी https://ecoagroservices.blogspot.com/ या लिंकला जा व पान उघडा. पानाच्या खालच्या उजव्या कोपऱ्यात  या चौकटीवर क्लिक आहे त्यावर क्लिक करा.  नवीन लेख प्रकाशित होताच त्याची सूचना तुम्हाला ई-मेल द्वारे प्राप्त होइल

लेखाबाबत काही प्रश्न / सूचना असल्यास आपण ecoagropune@gmail.com या ई-मेलच्या माध्यमातून आम्हाला पाठवू शकता.

Comments