मानवी आहाराची उत्क्रांती. (लेख क्रमांक २६)

 श्री रवींद्र थत्ते, 
संचालक,
इको ऍग्रो ग्रुप, पुणे

विज्ञानांतील प्रगती व वाढती सुबत्ता याने बहुतेक माणसे खूप जास्ती अन्नाचे सेवन करतात. वैद्यकीय सुविधा व भरपूर आहार मिळाल्यामुळे आयुर्मान वाढले पण अनेक व्याधी व समस्यांनी ग्रासले आहे. यामागची कारणे शोधताना मानवाच्या उत्क्रांती सोबतच पूर्वापार माणसाच्या आहाराविषयी माहिती घेणे फायदेशीर आहे.   

चार्ल्स डार्विनने १८७१ मध्ये मांडलेल्या सिद्धांतानुसार मूळ माकडापासून मानवाची शाखा वेगळी होऊन मानवाची उत्कांती झाली. आजमितीस उपलब्ध असलेले उपकरण व चाचण्यांमुळे हा सिद्धांत सिद्ध झाला कि ५० लाख वर्षापर्यंत मानव व माकड यांचे वंशज एकच होते. DNA विश्लेषणावरून चिंपांझी हा मानवाचा सगळ्यात जवळचा प्राणी आढळून आला. आजच्या मानवाची उत्पत्ती साधारणपणे २ लाख वर्षापूर्वी आफ्रिकेत झाली असे कार्ल आणि विल्सन या शास्त्रज्ञांनी माइटोकॉन्ड्रियल DNA वरून सिद्ध केले आहे.

सुमारे १० लाख ते १ लाख वर्षापूर्वी दोन पायावर चालणाऱ्या मानवाचा (होमो सेपियन्स: होमो – मानव, सेपियन्स - बुद्धिमान) उदय आफ्रिका खंडांत झाला. आफ्रिकेतून आशिया, युरोप या खंडात तो वाटचाल करू लागला. या वेळेला त्याचा आहार हा वनस्पतीजन्य व प्राणीजन्य होता. शिकार क्वचित सापडत असल्यामुळे कीटक, पाने, फुले, फळे, कंदमुळे, इत्यादी खाल्ले जायचे.

चिंपांझीच्या मेंदूचा आकार ६० लाख वर्षापूर्वी होता तेवढाच राहिला, पण साधारणपणे ८ लाख ते २ लाख वर्षाच्या कालावधीमध्ये मानवी मेंदूची वाढ मोठ्या प्रमाणात झाली. मानवाचा मेंदू पूर्वीपेक्षा तिप्पट आकाराचा झाला. मेंदूचा आकार मोठा होण्यामागे चयापचय बदलांमुळे अधिक अन्न मेंदूला व तुलनेने कमी अन्न (उर्जा) स्नायूंसाठी दिली जाऊ लागली. मानवी मेंदू हा शरीराच्या साधारणपणे २% (१२००-१४०० ग्रॅम) वजनाचा असतो. मात्र, त्याला शरीराला मिळणारा २०% प्राणवायू व रक्त पुरवठा केला जातो. एवढेच नाही तर शरीरात उपलब्ध असणाऱ्या साखरेपैकी अर्धी साखर (ग्लुकोज) हि फक्त मेंदू वापरतो. माकड फक्त ८% रक्त पुरवठा, प्राणवायू व कमी शर्करा मेंदूला पुरवते. मानवामध्ये शारीरक ताकदीपेक्षा मेंदूचा विकास होत गेला. आकाराने मोठ्या मेंदूमुळे वातावरणातील बदल व परिस्थितीला सामोरे जाण्याच्या क्षमतेमध्ये वाढ झाली.   

मानवी आहार: सिंहाने गवत खावे काय? हा त्याच्यासाठी पर्याय नाही. मानवाने शाकाहारी, मांसाहारी कि मिश्र आहार घ्यावा याबाबत विविध मते किमान ग्रीक काळापासून तरी आहेत. ग्रीक तत्वज्ञ पायथागोरस याचे २६०० वर्षापूर्वी असे मत होते कि माणसाने मांसा पासून (मांस खाऊन) मांस बनवणे चुकीचे आहे. मात्र बायबल (जेनिसीस ९:३) मध्ये प्रत्येक चालता-फिरता प्राणी हा तुझ्यासाठी (मानवासाठी) खाद्य आहे असे वचन आहे.  

मानवाची पचनसंस्था हि तुलनेने लहान व सुटसुटीत आहे व हि मोठ्या प्रमाणात तंतुमय वनस्पती खाण्यासाठी बनली आहे. मानवाला, प्राण्यांसारखे अणकुचीदार दात किंवा नखे नाहीत आणि म्हणून मांसाहार त्याच्यासाठी नाही, असे मात्र प्राचीन आहारावरून दिसून येत नाही. लाखो वर्षापूर्वीच्या जीवाश्मांवरती प्राचीन माणसाने प्राण्यांची हाडे दगडाने ठेचलेली (आतील गर खाण्यासाठी) तसेच दगडाच्या सुरीने घाव केल्याच्या खुणा दिसतात.

काही शास्त्रज्ञांच्या मते, दगड व लाकूड यापासून बनवलेल्या हत्यारांचा वापर प्राचीन मानवाला करता आल्यावरती, त्याला अधून मधून जास्त उष्मांक देणाऱ्या खाद्याची (मांस) उपलब्धता होऊ लागली व त्यामुळे मेंदूचा आकार वाढू शकला. मानवाच्या छोट्या पचनसंस्थेला अधिक उष्मांक असलेलेया खाद्यामुळेच अधिक रक्त पुरवठा मेंदूकडे कारणे शक्य झाले.

मानव हा सर्वभक्षीच असावा ह्या पुष्ठ्यर्थ: ब-१२ जीवनसत्व हे शरीरास आवश्यक असून ते कोणत्याही वनस्पतीमध्ये आढळत नाही. म्हणजेच फक्त वनस्पती खाण्यार्यांना ते मिळत नाही. फक्त शाकाहार केला असता, तर कुपोषणामुळे मानवाची प्रगती होऊ शकली नसती. (दुधामध्ये ब-१२ असते पण ते प्राणीजन्य समजले जाते, दुसरे म्हणजे मानवाला सुमारे १० हजार वर्षापूर्वीपासूनच जनावरे पाळता येऊ लागली.) 

मानवी आहारामधील दूसरा मोठा बदल म्हणजे शिजवलेले/ भाजलेले अन्न खाणे. खाण्यासाठी अन्न तयार करणे (दळणे, भरडणे, कापणे इत्यादी) व शिजवणे/ भाजणे याने अन्न पचायला सोपे जाते, अन्न पचवण्यासाठी कमी शक्ती लागते जी मेंदूकडे वळवता येते. उंदरांना कच्चे व शिजवलेले अन्न खायला घालण्याचा प्रयोग करण्यात आला. यामध्ये एका गटाला कच्चे पदार्थ तर दुसऱ्या गटाला उकडणे / भाजणे अशा प्रक्रिया करून तेच व तितकेच अन्न दिले असता कच्च्या पदार्थाच्या तुलनेत शिजवलेले पदार्थ दिलेल्या उंदरांच्या वजनामध्ये १५-४०% वाढ झाली.                

मानवी आहारामध्ये तीसरा मोठा बदल साधारण १० हजार वर्षापूर्वी मानव जेव्हा शेती करू लागला तेव्हा घडला. ज्वारी, सातू, गहू, मका, भात व शेंगा / कडधान्य या सारख्या पिकांच्या लागवडीमुळे धान्याची विपुलता निर्माण झाली.

पूर्वीच्या आहाराची वैशिष्टये:

  • जटील कर्बोदकांचे (Low GI) सेवन असल्यामुळे पचन क्रियेमधून हळूहळू शरीराला उपलब्ध व्हायचे.  
  • मोठ्या प्रमाणात तंतुमय वनस्पतींचे सेवन.
  • आहारामध्ये मीठ (सोडियम)चे प्रमाण नगण्य अथवा नाही.
  • शर्करा फक्त मध व फळामधून उपलब्ध असल्यामुळे त्याचे सेवन कमी.
  • आहार मिळेल तसा व तेव्हा खाल्ला जायचा. त्यामुळे आजच्या तुलनेत आहार कमी.  

मानवी आहारामध्ये उत्क्रांती अजून चालू आहे का ?

होय, पूर्वीच्या मानवापेक्षा आपले दात, जबडे, व चेहरे लहान झाले आहेत. आहाराच्या उत्क्रांतीबद्दलचे उत्तम उदाहरण हे लॅक्टोज सहनशीलतेचे देता येईल. बालकांना जन्मापासून मातेच्या दुधातील शर्करा (लॅक्टोज) पचवण्यासाठी आवश्यक लॅक्टेज नावाचे विकर (Enzymes) उपलब्ध असते. व मातेच्या दुधाचे सेवन बंद झाल्यावरती लॅक्टेज विकर कोणत्याही सस्तन प्राण्यामध्ये दिसून येत नाही.

सुमारे १०,००० वर्षापूर्वी जेव्हा माणसाने गाय, बकरी या सारख्या प्राण्यांचे पालन चालू केले तेव्हा जनावरांकडून दुध मिळू लागले व त्याच सुमारास गोपालन करणाऱ्या या लोकांमध्ये जनुकीय बदल होऊन लॅक्टोज पचवण्याची ताकत निर्माण झाली (लॅक्टेज विकर). दुधासोबत मिळणाऱ्या कॅल्शियम मुळे शरीराला योग्य पोषण, अतिरिक्त उष्मांक व मजबूत हाडे मिळाली. म्हणजेच हि उत्क्रांती अतिशय फायदेशीर ठरली कारण दुष्काळात दूध व दुग्धजन्य पदार्थ यांनी मानवाला कठीण प्रसंगी जगवले.

आपण जो आहार करतो त्यामधील पिष्ठमय पदार्थ पचवण्याची क्रिया हि तोंडापासुनच चालू होते. अन्न चावताना त्यामध्ये लाळेचे मिश्रण होऊन त्यातील अमायलेज हे विकर कर्बोदकांचे पचन चालू करते. पिष्ठमय पदार्थ हा ज्या लोकांच्या अन्नातील प्रमुख घटक आहे, त्यांच्या लाळेमध्ये कर्बोदके पोटापर्यंत पोहोचण्यापूर्वीच पचन करण्याची क्षमता असते.

उपलब्ध खाद्य पूर्ण पचवण्याची शक्ती, पोटातील जीवाणू प्रदान करतात. पूर्वी जेव्हा दळणवळणाची साधने नव्हती त्या वेळेस स्थानिक उपलब्ध धान्य, शेंगा, कंद, हंगामी भाजी पाला, फळे इत्यादींचे सेवन केले जायचे. तेथील वातावरण, त्या जमिनीमध्ये वाढणारी पिके/वनस्पती/धान्य(बिया)/मुळांवर/पानांवर तसेच जमिनीमध्ये राहणारे सूक्ष्म जीवाणू, व सदर अन्न खाणारे प्राणी व मानव हे एकाच खाद्य चक्राने बांधलेले होते. याला चक्र म्हंटले आहे कारण मानव, अथवा जनावरांकडून वनस्पती खाल्यानंतर, पचन संस्थेमधून बाहेर टाकलेला पदार्थ परत त्याच मातीमध्ये पडत होता.

ज्या प्रमाणे जमिनीतील/पानावरील रोगकारक सूक्ष्म जीवांपासून संरक्षण / प्रतिकार करण्याची शक्ती वनस्पतीला इतर जीवाणू उपलब्ध करून देतात, त्याप्रमाणे पोटातील जीवाणू मानवाला स्वस्थ ठेवतात व रोगांचा प्रतिकार करण्याची क्षमता देतात.

मानवाच्या शरीरावरती केसापासून ते पायाच्या बेचक्यांपर्यंत विविध जीवाणू राहतात. ठराविक भागावरती ठराविक जीवाणूंच्या प्रजातीच आढळतात. आकृती: १ (संदर्भ:विकीपेडिया)

मानवाच्या शरीरात असलेल्या एकूण पेशींच्या १० पट अधिक जीवाणू शरीरामध्ये व शरीरावर आढळतात. माणसाच्या पचन संस्थेमध्ये (तोंड, पोट, आतडे) प्रचंड संख्येने (१०१४) सूक्ष्म जीव, प्रामुख्याने जीवाणू आढळून येतात. मानवाच्या शरीरातील जीवाणूंचे वजन १.८ ते २.७ किलो असते. तोंडामध्ये ६०० प्रजाती, त्वचेमध्ये ६००, लहान व मोठे आतडे ८००० व जननेंद्रियमध्ये २०० प्रजाती आढळून येतात. या मध्ये इतकी विविधता आहे कि, साधारणपणे १,००० प्रकारचे जीवाणू पचन संस्थेमध्ये आढळतात परंतु यातील जवळपास ९९% जीवाणू हे फक्त ३० ते ४० प्रजातींचे असतात. जीवाणूंच्या या प्रचंड उपलब्धतेमुळे शुष्क विष्ठेमधील ६०% वस्तुमान हे केवळ जीवाणूंचे असते. शरीराअंतर्गत असणाऱ्या जीवाणूंमध्ये प्राणवायूच्या सान्निध्यात राहणारे व प्राणवायू विरहीत राहणारे असे दोन्ही जीवाणू आढळतात. मानवाच्या गुणसूत्र (DNA) पेक्षा १०० पट अधिक गुणसूत्रे ह्या जीवाणूंचे आहेत, त्यामुळे जीवाणूच माणसाला चालवतात असे म्हणणे वावगे ठरणार नाही. आकृती २ 

बालकाला सुरुवातीच्या दुधामधून प्रतिकार क्षमता निर्माण करणारे जीवाणू प्रदान केले जातात. सभोवतालचे वातावरण, लोकांचे सान्निध्य, घरात असलेले प्राणी व मिळणाऱ्या आहाराप्रमाणे पोटातील जीवाणूंची वसाहत निर्माण होती. नवीन संशोधनाने असेही दिसून आले कि बाळाचा जन्म नैसर्गिक कि सिझेरियने झाला? तसेच मातेचे का डब्ब्यातील दुध? यानुसार पचनसंस्थेतील जीवाणूंच्या भिन्न प्रजाती आढळून येतात व या दोन्हीमध्ये प्रतिकार क्षमतेमध्ये मोठा फरक पडतो.

सन २००० पर्यंत मातेचे दुध निर्जंतुक असते असे समजले जायचे पण, आता असे सिद्ध झाले आहे कि, मातेच्या दुधामध्ये जीवाणू असतात व बाळाच्या पचन संस्था व पोषणासाठी ते अत्यंत महत्वाचे कार्य करतात.  

मानवाने जन्म घेतल्यानंतर एक ते दोन वर्षात पचन संस्थेमधील आवश्यक जीवाणूंची स्थापना होऊन आतड्यातील अंतर्गत अस्तर तयार होते. मनुष्य शरीरामधील या जीवाणूंचे वास्तव्य परस्पर-पूरक असे असते. हे जीवाणू अनेक प्रकारचे अंत्यंत उपयुक्त कार्य करतात, जसे,

  • प्रतिकार क्षमता निर्माण करण्यासाठी जैव रसायनांची निर्मिती.
  • जीवनसत्व "के" ची निर्माती.
  • काही संप्रेरकांची निर्मित.
  • पचण्यास कठीण पदार्थांचे विघटन आणि विल्हेवाट.
  • रोग कारक जीवाणूंचा नाश.
  • अन्नातील पोषक तत्वे माणसाला उपलब्ध करून देणे.
  • मन:स्थिती / भावदशा / चित्त:वृत्ती घडवतात अथवा परिणाम करतात. 

आकृती ३ (पचनसंस्थेतील जीवाणू व मेंदू यांचा परस्पर संबंध)

जगातील भौगोलिक प्रदेश व तेथील लोकांचे आहार यानुसार आतड्यातील जीवाणूंच्या प्रकारामध्ये भिन्नता दिसून येते. तसेच वयोमानानुसार तसेच शाकाहारी कि मांसाहारी याच्यानुसार सुद्धा बदल होतो.   

पचन संस्थेतील विविध ठिकाणी सामू १.५ ते ९ इतका भिन्न असतो. पण इतक्या जास्त आम्ल –विम्ल परिस्थितीतही जीवाणू जगतात.

आकृती ४: पचन संस्थेतील विविध ठिकाणी आढळणारा सामू व सामान्यत: अन्न तिथे किती वेळ असते

असे म्हंटले जाते कि, तुम्ही कोण आहात/काय बनणार हे तुम्ही काय खाता? किती खाता? केव्हा खाता? व कसे खाता? यावर अवलंबून आहे. अनेक समाजामध्ये पचनसंस्था कार्यक्षम ठेवणे याला प्राचीन काळापासून पुष्कळ महत्व दिले जायचे व त्यासाठी उपवास, विशिष्ठ आहार व आचरण केले जायचे.

आज आपण रोज खाणाऱ्या भाज्यांमधील कोबी, फ्लॉवर, वांगे, बटाटा, टोमाटो, मिरची (ढोबळी आणि साधी मिरची) तसेच शेंगदाणे हे ५०० वर्षापूर्वीपर्यंत भारतात निर्माण होत नव्हते. इतकेच नव्हे तर महाराष्ट्रातील स्थानिक बहुसंख्य लोक ज्वारी, बाजरी, नाचणी, सातू व भात हे पारंपारिक धान्य खाण्याऐवजी गहू, मैदा याचे जास्त सेवन करतात. तीच गोष्ट तेलाच्या बाबत. तीळ, कारळे, करडई, नारळ, मोहरी या खाद्य तेलांचा अतिशय माफक वापर पूर्वी होयचा. आज सर्वाधिक वापरली जाणारी  सोया, पाम, शेंगदाणे, सुर्यफुल या तेलबिया पिके भारतासाठी नवीन आहेत.   

तज्ञांच्या मते अनुवांशिकपणे मिळालेली पचनसंस्था (पोटातील सूक्ष्म जीवाणू) या नवीन आहाराशी इतक्या लवकर - १०, २० नव्हे तर ५०० वर्षात सुद्धा जुळवून घेऊ शकत नाहीत कारण पोटातील ठराविक जीवाणू व मानवाचे नाते लाखो वर्षापासून आहे.  

जागतीकीकरणामुळे जगातील बहुसंख्य लोकांच्या आहारामध्ये एक किंवा दोन पिढी मध्ये इतका बदल झाला आहे कि त्यांच्या पचन संस्थेमधील जीवाणूंना ह्या नवीन खाद्यपदार्थांशी जुळवून घेता येत नाही तसेच त्यापासून पूर्ण पोषण द्रव्ये मिळवू शकत नाहीत. त्यामुळे निव्वळ उच्च उष्मांकांची खाद्य पदार्थ/पेये यांनी जगभरच्या लोकांना अनेक आजारांनी ग्रासले आहे. आपल्याकडील मधुमेह, लठ्ठपणा व हृदयविकाराचे प्रमाण वाढण्यामागे हीच प्रमुख कारणे आहेत. याची तुलना पेट्रोलवर चालणाऱ्या गाडीमध्ये आपण डीजल घातले तर काय होते याच्याशी करता येईल.   

कमी आहार:

उंदरावर केलेल्या प्रयोगावर असे दिसून येते कि भरपेट खाद्य मिळणाऱ्या उंदरांच्या तुलनेत ज्या उंदरांना जेमतेम जीवनावश्यक खाद्य मिळाले त्यांना दीर्घायुष्य लाभले. आपल्या पूर्वजांना हे पूर्वीच ठाऊक असले पाहिजे कारण भरपेट खाऊ नका "भुका रखो चौथा कोन ! " हि म्हण पूर्वापार आहे.

जास्त प्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थांचे सेवन:  

जास्त प्रक्रिया केलेल्या पदार्थांचे आजच्या आहारात वापर होतो. जास्त प्रक्रियेचा अर्थ अन्नपदार्थामध्ये रासायनिक पद्धतीने केलेले परिवर्तन (यांत्रिक नव्हे). याबाबत महत्वाच्या मुद्द्ये पुढीलप्रमाणे: 

  • यामध्ये खूप जास्त सुक्रोज अथवा फ्रुक्टोज कॉर्न सिरप असते व त्यामुळे शरीराला अतिरिक्त उर्जा मिळते व शरीराला हानिकारक असते.  
  • यामध्ये विद्राव्य तंतुमय पदार्थ नसल्यामुळे जलद गतीने पचन होते, पण पुन्हा भूक लागते.
  • वेफर्स सारखे तळलेले पदार्थ सतत खात राहावे अश्या प्रकारे जाणीवपूर्वक प्रक्रिया केलेलं असतात. 
  • जास्त तापमानाला तेलामध्ये ट्रान्स फॅट नावाचे घटक पदार्थ तयार होतात.
  • यामध्ये रंग, टिकाऊपणा, स्वाद वाढवण्याकरता अनेक रसायने मिसळलेली असतात.
  • यामध्ये मिठाचे प्रमाण खूप जास्त असते.
  • यामध्ये खनिजे, जीवनसत्वे, अँटीऑक्सिडेंट नसतात त्यामुळे पोषण मुल्ये कमी.
  • रिफाईंड तेल आणि डालडा यासारख्या पदार्थांचा वापर केला जातो.  

सामान्यत: सेवन केली जाणारी औषधे ज्यांनी पोटातील जीवाणूंच्या क्रियेमध्ये बाधा येते.

  • मधुमेहासाठी सामान्यत: वापरले जाणारे मेटफॉर्मिन
  • विविध प्रकारची रेचके.
  • तोंडावाटे सेवन केलेली स्टिरॉइड्स.
  • पोटातील सामू बदलणारी औषधे. (अँटासिड)
  • नैराश्यप्रतिरोधक / मानसोपचारसाठी दिलेली काही औषधे.
  • वेदना शामक / सूज कमी करणारी औषधे.
  • झोप लागण्यासाठी दिलेल्या गोळ्या.
  • कोलेस्टेरॉल कमी होण्यासाठीचे स्टेटिन्स.
  • प्रतिजैविके: रोगकारक तसेच उपयुक्त जीवाणू मारणाऱ्या व्यापक स्वरूपाच्या प्रतिजैविकांमुळे,
    • पोटातील/आतड्यातील जीवाणूंचा सर्वकष नायनाट होतो व त्यामुळे पचन संस्था बिघडते.
    • जीवाणूंच्या प्रजातीमधील संख्याबळ सुद्धा बदलते.
    • कर्बोद्कांचे पचन नीट होत नाही.

आहारामधील बदल:

जगभरातले लोक अधिकाधिक प्रमाणात फक्त गहू, मका, भात, साखर, तेल, व प्राणीजन्य पदार्थ यापासून जास्तीत जास्त उष्मांक मिळवतात. ज्वारी, बाजरी, नाचणी, कंदमुळे, कडधान्य अथवा शेंगवर्गीय पिके यांचा वापर कमी झाला आहे. मागील पन्नास वर्षांमध्ये युरोप, उत्तर व दक्षिण अमेरिकेतील लोकांचा आहारामध्ये होणारा बदल हा त्या मानाने कमी आहे. मध्य पूर्व आशिया यांच्या आहारामध्ये  बराच फरक पडला आहे. आफ्रिकेतील १८ देशांच्या २५% पेक्षा अधिक बदल झाला आहे. १९६१ पासून काँगो या देशामध्ये साखरेच्या उपभोगाचे प्रमाण ८५८% इतके वाढले आहे. आशियातील देशांमध्ये देखील प्राणीजन्य पदार्थांच्या सेवनाचे प्रमाण वाढले असून, भात, नाचणी, रताळी, यासारख्या पदार्थांचे सेवन घटले आहे.   

सुबत्तेमुळे व दुसऱ्याचे अनुकरण करण्याच्या वृत्तीमुळे पूर्वीचे आहार व जेवणाची पद्धत, वेळ, इत्यादीमध्ये बदल झाल्यामुळे लट्ठपणा, मधुमेह, हृदयविकार व इतर अनेक व्याधी अगदी खेड्यातील माणसांना देखील भेडसावतात. हे रोग नाहीसे करण्यासाठी कोणतेही जडी-बुटी/औषध हे कायम स्वरूपी दिलासा देऊ शकत नाहीत.

जीवनशैलीमध्ये बदल, आहारामध्ये बदल, व्यायाम ह्याच गोष्टी निरोगी आयुष्यासाठी महत्वाच्या आहेत. 

सदर लेखमालेतील लेख आवडला असल्यास इतरांना या लेखाची लिंक पुढे पाठवा तसेच या ब्लॉगला फॉलो (Follow) करा. Follow करण्यासाठी https://ecoagroservices.blogspot.com/ या लिंकला जा व पान उघडा. पानाच्या खालच्या उजव्या कोपऱ्यात  या चौकटीवर क्लिक आहेत्यावर क्लिक करा.  नवीन लेख प्रकाशित होताच त्याची सूचना तुम्हाला ई-मेल द्वारे प्राप्त होइल

लेखाबाबत काही प्रश्न / सूचना असल्यास आपण ecoagropune@gmail.com या ई-मेलच्या माध्यमातून आम्हाला पाठवू शकता.

Comments

  1. खुप छान अप्रतिम लेख, धंन्यवाद

    ReplyDelete

Post a Comment