आंब्याच्या दर्जेदार उत्पादनासाठी वाढीच्या अवस्थेनुसार अन्नद्रव्य व्यवस्थापन. (लेख क्रमांक ३२)

 श्री रवींद्र थत्ते, 
संचालक, इको ऍग्रो ग्रुप,
पुणे.

दर्जेदार व भरपूर आंबा फळांसाठी निरोगी, जैविक व अजैविक ताण नसणारी आंब्याची झाडे असावीत.

उत्तम आंबा उत्पादन घेण्यासाठी मागील वर्षाचे उत्पादन, हवामान व चालू वर्षामध्ये अपेक्षित हवामानास अनुसरून नियोजन करणे महत्वाचे आहे. अन्नद्रव्य व्यवस्थापन हा एकूण पीक व्यवस्थापनातला महत्वाचा मुद्दा असला तरी इतर बाबींकडे दुर्लक्ष होता कामा नये.  

अधिक व दर्जेदार आंबा उत्पादनासाठी, आंब्याची फिनोलोजी म्हणजेच वातावरणाशी निगडीत जीवनक्रम समजून घेतला पाहिजे. पिकाची जात, वातावरण आणि व्यवस्थापन यांचा परिणाम फिनोलोजीवर होतो, व त्याचा परिणाम उत्पादक्तेवरती होतो. म्हणुनच आंब्याच्या फिनोलोजीप्रमाणे व्यवस्थापन केले तर त्याचा फायदा होऊ शकेल.

आंब्याच्या जीवन चक्रातील महत्वाच्या घटना पुढील प्रमाणे: (आंबा फळ उतरवल्यानंतर)

  • नवीन पालवी येणे
  • नवीन मुळांची वाढ
  • फुटीची सुप्तावस्था
  • फुलोरा आणि परागीकरण
  • फळ धारणा
  • फळांची वाढ
  • नवीन मुळांची वाढ
  • काढणी

सौर उत्सर्जन, तापमान, पर्जन्याचे प्रमाण आणि हंगामातील बदलानुसार आंब्याची वाढ घडते.

आंबा फिनोलॉजी: तापमानातील कमी / वाढ, पर्जन्यमानाचे प्रमाण व कालावधी यांनुसार फिनोलॉजिकल बदल घडून येतात. कोरडे वातावरण व पर्जन्यमानाचे दिवस यानुसारही फिनोलॉजिकल बदलांचा क्रम ठरतो. 

तापमानाचा प्रभाव: आंबा पिकाचे जीवन चक्र, फुलोऱ्याची वेळ व पुनरावृत्ती, फळ वाढ, चव, आकार व रूप या सर्वांवरती तापमान प्रभाव करते.

१७°C च्या खाली असलेल्या थंड तापमानात विकृत आणि अक्षम परागकण तयार होतात. १५°C पेक्षा कमी थंड तापमानाचा परागकण नलिकेच्या वाढीवर आणि फळ धारणेवर विपरित परिणाम होतो.

थंड वातावरणामध्ये नर व उभयलिंगी फुलांची संख्या वाढते व उत्पादकता कमी होते.

पर्जन्याचा परिणाम: मोहोरापूर्वी आणि फुलोऱ्याच्या कालावधीमधील पावसामुळे परागीकरण क्रिया कमी होते, फळधारणा कमी होते आणि उत्पन्नावर विपरीत परिणाम होतो.

ज्या भागामध्ये पाऊस कमी असतो आणि सापेक्ष आर्द्रताही कमी असते अशा ठिकाणी आंब्याची फुलधारणा, फळधारणा आणि काढणीपर्यंत वाढ चांगली होते. जास्त पाऊस व जास्त आर्द्रता असलेल्या ठिकाणी अँथ्रॅकनोज हि समस्या बनू शकते. कोकणामध्ये जास्त पर्जन्यमान असूनही पावसाळ्यानंतर कोरडे हवामान लाभते ज्यामुळे फुलोरा, फळ धारणा व फळ वाढ चांगली होऊ शकते.  

नवीन पालवी:

  • पश्चिम भारतात नवीन पालवीचा काळ फेब्रुवारी ते मार्च, मार्च ते एप्रिल आणि ऑक्टोबर ते नोव्हेंबर या काळात पाहायला मिळतो.
  • तरुण झाडांना नवीन पालवी सतत येत राहते. तरुण झाडांची वाढ सतत चालू राहते.  
  • शाकीय वाढ / नवीन पालवी आल्यामुळे झाडाची वाढ होते, नवीन पाने अन्नद्रव्ये प्रकाश संश्लेषणा मार्फत पिकाचे अन्न तयार करतात. नवीन पालवी पक्व होयला लागली कि मुळांची वाढ होते, ज्यामुळे जमीनीतून अधिक प्रमाणात अन्नद्रव्ये व पाणी घेता येते.
  • फुटींची वाढ थांबल्यावर (सुप्तावस्था मध्ये) आंब्याला कर्बोदकांचा साठा करण्यास अवधी मिळतो. आंब्याला मोहोर येण्यासाठी हा साठा आवश्यक असतो. 
  • इष्टतम तापमानात, पाण्याची व अन्नद्रव्याची उपलब्धता असताना आंब्याच्या झाडांना वारंवार नवीन पालवी येऊन सतत शाकीय वाढ चालू राहते. नवीन फुटींची वाढ थांबल्यानंतर मोहोर / फुलोरा येण्यासाठी डोळे तयार होतात व फुगतात.
  • जर जास्त काळ उष्ण तापमान, पर्जन्यमान आणि आर्द्रता राहिली तर आंबा पिकाची सतत शाकीय वाढ चालू राहते.  कोरडे हवामान लाभून शाकीय वाढ थांबली तरच झाडाला मोहोर येऊ शकतो.
  • नवीन पालवी मधील पानांची संख्या आणि आकार हे त्यावेळेच्या तापमानावर अवलंबून असते. जमीनीच्या तापमानाचा (जे हवेच्या तापमानावर अवलंबून असते) शाकीय व फळ उत्पादन अवस्थेवर परिणाम होतो. दोन वर्षातून एकदाच फळ धारण करणाऱ्या जातींमध्ये फळधारणा, हंगाम संपल्यानंतरच्या  काळात फारशी शाकीय वाढ होत नाही.
  • आंब्याच्या यशस्वी उत्पादनांसाठी फुलोरा अवस्थेमध्ये पाऊस नसावा. पाऊस अथवा दमट वातावरणामध्ये परागकण, परागीकरण न करता निथळून जाऊ शकतात. याशिवाय गळ-कुज होऊन नुकसान होऊ शकते.
  • आंबा फळधारणेच्या अवस्थेत म्हणजेच फुले पूर्णपणे उघडी आणि कार्यक्षम असताना प्रतिकूल हवामानास अत्यंत संवेदनशील असतो. बीजांडाचा गर्भपात, अक्षम पराग, परागनलिकांची वाढ न होणे आणि कमी फलन यामुळे कमी उत्पन्न मिळते.

मोहोर येण्याची वेळ:

  • भारतात दक्षिणेकडील केरळ भागात १ डिसेंबरच्या सुमारास आणि कर्नाटक, महाराष्ट्र या भागात १५ डिसेंबरनंतर मोहोर येण्यास सुरुवात होते.
  • कोरडे शुष्क व थंड हवामान मिळाल्यानंतर मोहोर येण्याची प्रक्रिया सुरु होते. ज्या भागात थंडी नसते अशा ठिकाणी ६-१२ आठवड्यांचा पाण्याच्या ताण बसल्यास मोहोर येतो.

परागीकरण:

  • आंब्यामध्ये स्वपरागीकरण होते तसेच हवेमार्फत व अनेक प्रकारच्या किटकांमार्फात परागीकरण होते. कीटकांमध्ये बरीच विविधता असून यामध्ये मुंग्या, माश्या, फुलपाखरू, मधमाश्या यांचा समावेश होतो.
  • आंब्याची जात व वातावरणाप्रमाणे नर व उभयलिंगी फुलांचे प्रमाण बदलू शकते.

फळांची वाढ आणि विकास:

  • फळ धारणेपासून ते फळांच्या पक्वते पर्यंत लागणारा कालावधी हे आंबा पिकाला  मिळणाऱ्या उष्मांकावर अवलंबून आहे. डिग्री - दिवस या पद्धतीने ते मोजले जाऊ शकते.
  • उच्च तापमानामुळे आंबा फळामध्येही शारीरिक बदल होतात. हापूस आंब्यामधील स्पॉन्जी टिश्यू (साका), हि विकृती फळांना उच्च तापमान मिळाल्यामुळे होते.
  • फळांच्या परिपक्वतेच्या कालावधीत पाऊस / उच्च आर्द्रता असली तर फळ माशी, अँथ्रॅकनोज आणि कोय पोखरणारा भुंगा यांचा जास्त प्रमाणात हल्ला होतो. याउलट, स्वच्छ सूर्यप्रकाशात चांगल्या रंगाची आणि तुलनेने रोगमुक्त फळे तयार होतात.

आंबा पिकासाठी अन्नद्रव्याचे व्यवस्थापन:

  • आंबा पिकासाठी जमिनीचा सामू ५.० ते ७.० हा सर्वात उत्तम समजला जातो. माती तसेच पान –देठ परीक्षणाचा वापर केला तर दर्जेदार व अधिक उत्पादन मिळणे शक्य आहे. पान देठ परीक्षणाने नेमकी कोणती अन्नद्रव्ये कमी आहेत व कोणती खूप जास्त आहेत याची माहिती मिळाल्यामुळे अचूक अन्नद्रव्य व्यवस्थापन करता येते.
  • अन्नद्रव्य व्यवस्थापन करताना मिळणाऱ्या उत्पादनासाठी किती अन्नद्रव्ये जमिनीतून घेतली जातात याचा विचार करून त्याप्रमाणे पुरवठा करता येतो.  

आंब्याच्या १ टन उत्पादनामध्ये असलेली अन्नद्रव्ये:

अन्नद्रव्ये

ग्रॅम

नायट्रोजन

८४५

फॉस्फरस

१८०

पोटॅशियम

१२८५

कॅल्शियम

११५०

मॅग्नेशियम

२४०

बोरॉन

जस्त

लोह

आंब्याचे दर्जेदार व उत्तम उत्पादन मिळण्यासाठी आंब्याच्या पान देठामध्ये अन्नद्रव्यांचे प्रमाण किती असावे हे पुढील तक्त्यामध्ये दर्शवले आहे. आंबा पान-देठ परीक्षण हे शेवटच्या पूर्ण परिपक्व पानाचे केले जाते.

आंबा पान देठ परीक्षण:

अन्नद्रव्ये

प्रमाण मोजण्याची पद्धत (% अथवा ppm)

अपेक्षित प्रमाण

नायट्रोजन

(% N)

१-१.५

(जातीनुसार बदल असू शकतो)

गंधक

(% S)

०.१ - ०.२

फॉस्फरस

(% P)

०.०८ - ०.१८ (०.१-०.२)

पोटॅशियम

(% K)

०.३ - १.२ (०.७५ - १.२)

कॅल्शियम

(% Ca)

२.० - ३.५

मॅग्नेशियम

(% Mg)

०.१५ - ०.४

सोडियम

(% Na)

< ०.२०

क्लोराईड

(% Cl)

< ०.२५

बोरॉन

(ppm B)

५० - ७० (५० - 80)

जस्त

(ppm Zn)

२० - १००

तांबे

(ppm Cu)

१०- २०

लोह

(ppm Fe)

३० - १२० (७० - २००)

मॅंगनीज

(ppm Mn)

६० - ५००

मॉलिब्डेनम

(ppm Mo)

०.०५ - १.०

वरील माहिती "ट्रॉपिकल हॉर्टीकल्चरल कन्सल्टिंग, ऑस्ट्रेलिया" यांची आहे. आपल्या कृषी विद्यापीठांकडे अथवा खाजगी प्रयोगशाळांमध्ये आपल्याकडील आंबा जातीप्रमाणे अशी माहिती आहे. 

आंब्यामध्ये अन्नद्रव्यांची इष्टतम पातळी: (विविध भारतीय जाती)

अन्नद्रव्ये

हापूस

तोतापुरी

दशेहरी

चौसा

लखनौ सफेदा

नत्र (%)

०.७८-१.६५

०.८४- १.५३

१.२३

१.१७

१.२

फॉस्फरस(%)

०.०२-०.३३

०.६४-०.१५

०.०६

०.११

०.१

पोटॅशियम(%)

०.७७-१.७३

०.५२-१.१०

०.५४

०.५९

०.५

कॅल्शियम(%)

०.७६-१.६३

१.९७-३.२०

१.७१

२.९९

३.०४

मॅग्नेशियम(%)

०.४०-०.६५

०.४०-०.६५

०.९१

०.५

०.४७

गंधक (%)

०.०४-०.१३

०.१५-०.२२

०.१२

०.१६

०.१७


४ टन/एकर आंब्याच्या उत्पादनामधून अन्नद्रव्यांची होणारी उचल.

अन्नद्रव्ये

अन्नद्रव्यांची उचल. (कि.ग्रॅम)

नायट्रोजन

३.४

पोटॅशियम

५.१६

कॅल्शियम

४.६

बोरॉन

०.८

पिकाच्या जीवन क्रमानुसार पीक पोषण.

आंब्याला अवस्थेनुसार लागणाऱ्या अन्नद्रव्याचे प्रमाण.

पिकाच्या पूर्ण जीवन क्रमासाठी लागणाऱ्या एकूण अन्न्द्रव्यांपैकी विशिष्ट अवस्थेसाठी किती अन्नद्रव्ये लागतात हे वरील तक्त्यामध्ये दिले आहे. शाकीय वाढीच्या कालावधीमध्ये सुद्धा पिकाला अन्नद्रव्याची गरज असते व ती भागवली तरच उत्पादकता व दर्जा वाढू शकतो.

अन्नद्र्व्याचा वापर करताना त्यांचा प्रकार, जमीनीतून देताना त्यांची कार्यक्षमता या बाबी लक्षात घ्याव्यात, कारण जमिनीत दिलेल्या अन्नद्र्व्यांपैकी फार थोडा भाग पिकाला उपलब्ध होतो. बाकीचा निचरा होऊन अथवा इतर अन्नद्रव्यांशी संयोग होऊन अनुपलब्ध होतो. अन्नद्रव्य व्यवस्थापन करताना फवारणी द्वारे देण्याची खते हि जास्त कार्यक्षम व तत्काळ उपलब्ध असतात व त्यांचा गरजे प्रमाणे वापर करता येतो. 

सदर लेखमालेतील लेख आवडला असल्यास इतरांना या लेखाची लिंक पुढे पाठवा तसेच या ब्लॉगला फॉलो (Follow) करा. Follow करण्यासाठी https://ecoagroservices.blogspot.com/ या लिंकला जा व पान उघडा. पानाच्या खालच्या उजव्या कोपऱ्यात  या चौकटीवर क्लिक आहेत्यावर क्लिक करा.  नवीन लेख प्रकाशित होताच त्याची सूचना तुम्हाला ई-मेल द्वारे प्राप्त होइल

लेखाबाबत काही प्रश्न / सूचना असल्यास आपण ecoagropune@gmail.com या ई-मेलच्या माध्यमातून आम्हाला पाठवू शकता.

Comments