खर्च, मूल्य, किंमत (लेख क्रमांक ३३)

  श्री रवींद्र थत्ते, 
संचालक, 
इको ऍग्रो ग्रुप, पुणे.

प्रत्येक व्यवसायिकाला व्यवसायात नफा कमावण्यासाठी खर्चावर नुसते नियंत्रण ठेवायचे नसते तर खर्चावर आधारित विक्रीची किंमत काढायची असते. अन्यथा नूकसान होते. शेती हा व्यवसाय असल्यामुळे शेतकऱ्याने देखील या अर्थशास्त्रीयबाबी समजावून घेण्याची गरज आहे व त्याप्रमाणे निविष्ठा खरेदी करताना स्वतःचा फायदा करून घेतला पाहिजे. 

खर्च: उत्पादन तयार करण्यासाठी/सेवा देण्यासाठी खर्च झालेली रक्कम. साधारणपणे ह्याच्यामध्ये नफा मिळवलेला असतो. उत्पादन तयार करण्यासाठी लागलेला कच्चा माल, भांडवल, यंत्र सामुग्री, वाहतूक खर्च, हमाली, कामगारांचे पगार, जागेचे भाडे, इत्यादी सर्व रक्कम हि खर्च म्हणून धरली जाते व किती उत्पादने तयार झाले याने भागून एका नगाचा खर्च काढला जातो.

या शिवाय शब्द जरी वेगेळे असले तरी खर्च असणाऱ्या इतर संज्ञा: फी, दलाली, भाडे, अडत, पगार यांचा यात समावेश होतो. 

वस्तुतः उत्पादक कंपनीचे इतर खर्च उदा: संशोधन आणि विकास, देखभाल – दुरुस्ती खर्च, वैधानिक परवानग्या मिळवण्यासाठी करावा लागलेला खर्च, उत्पादकाला भरावा लागणारा कर, याचा खर्चामध्ये समावेश होतो.

किंमत: ग्राहकाने वस्तू अथवा सेवा विकत घेण्यासाठी विक्रेत्याला मोजलेली रक्कम. किंमती विषयी एकमत झाल्यानंतरच खरेदी - विक्रीचा व्यवहार होतो. किंमत हि मागणी व पुरवठा यावर आधारित असते.

मूल्य: हे व्यक्तीसापेक्ष असते. एखाद्या व्यक्तीस त्या वस्तूची अथवा सेवेची उपयुक्तता, योग्यता व गुणवत्ता कशी वाटते यावरही आधारित असते. 

व्यापारी चिन्ह (ब्रँड): व्यापारामध्ये विक्रेता स्वतःच्या उत्पादनाचे वेगळेपण / वैशिष्ठ्य दर्शवण्यासाठी नाव, शब्द, घोषवाक्य, शीर्षक, लोगो, चिन्ह, चित्र/प्रतिमा, लिपी किंवा या सर्वांचा एकत्रीत वापर करतो.  

पुरवठा साखळी व्यवस्थापन: कारखान्यामध्ये उत्पादन निर्मितीसाठी कच्चा मालाची आवक करण्यापासून ते तयार माल अंतिम ग्राहकांपर्यंत पोहचवण्यासाठी उभारलेली यंत्रणा अथवा साखळी. उत्पादनाचा खर्च कमीत कमी ठेवायचा असल्यास प्रमुख अथवा सर्वच कच्चा माल कारखान्याजवळ उपलब्ध असणे, तिथे कुशल कर्मचारी स्वस्तामध्ये उपलब्ध होणे, तसेच तयार मालासाठी बाजारपेठ जवळ असणे या गोष्टी महत्वाच्या असतात. या शिवाय विपणन व्यवस्थेवरील कमीत कमी खर्च हा सुद्धा महत्वाचा मुद्दा आहे.  

विपणन व्यवस्था (साखळी): उत्पादनाच्या ठिकाणापासून (विक्रेता) ते ग्राहक (उपभोक्ता) पर्यंत वस्तूचे स्वामित्व पोहचवण्याचे कार्य. विपणन साखळीमध्ये विविध संस्था, कर्मचारी व क्रिया यांचा समावेश असतो.

उत्पादकापासून उपभोक्त्या पर्यंत साखळी जितकी मोठी, तितका खर्च जास्त असतो व तेवढा जास्त पैसा ग्राहकाला मोजावा लागतो. यामध्ये विविध पद्धतीने केलेल्या जाहिरातीचा (TV, वृत्तपत्रे, मासिके, होर्डिंग, भित्तीचित्रे, सोशल मिडिया मधील मार्केटिंग इत्यादी खर्च तसेच विक्री व्यवस्थेसाठी नेमलेले प्रतिनिधी, व्यवस्थापक यांचे खर्च, वितरकांना दिलेल्या सुविधा, लाभ, स्कीम, टूर इत्यादी) खर्च सुद्धा ग्राहकांकडूनच वसूल केले जातात. 

विपणन व्यवस्था (साखळी): विपणन व्यवस्था (साखळी) मधील साधारणत: आढळणारी विविध विविध स्तरीय रचना. 


विपणन व्यवस्था (साखळी) मधील आकृती मध्ये दाखवल्याप्रमाणे शून्य स्तर मध्ये उत्पादक थेट ग्राहकाला विक्री करतो. उदा: "डेल" कॉम्पुटर बनवणारी कंपनी थेट ग्राहकांना पुरवठा करते.

एक स्तरीय साखळी मध्ये आपण आयुर्विमा यांचे उदाहरण घेऊ शकतो. विमा कंपनी व उपभोक्ता यांच्यामध्ये कंपनी प्रतिनिधी हा एकमेव दुआ असतो.

दळणवळणाच्या साधनांचा झालेला विकास व खेड्यापाड्या पर्यंत / घरपोच कुरियर, पार्सल सेवा उपलब्ध झाल्यामुळे उत्पादक ते ग्राहक यांच्यातील साखळी काही प्रमाणात कमी होत आहे.

काही उत्पादक वस्तू वा सेवा विकताना स्वत:ची विक्री केंद्रे प्रस्थापित करतात. यामध्ये ग्राहकाशी चांगली जवळीक साधता येते, अधिक चांगली सेवा दिली जाऊ शकते, विपणनणाचा खर्च कमी करता येतो, ब्रँडचा प्रचार करता येतो अशी अनेक उद्दिष्टये साध्य करता येतात. उदा: IKEA किंवा मॅकडोनाल्ड यांचे बहुतांश ठिकाणची विक्री केंद्रे हि स्वतःच्या मालकीची असतात व त्यातील कर्मचारी थेट कंपनीचे कामगार असून कंपनीच्या मानांकनाप्रमाणे सेवा पुरवितात.

काही उत्पादनांची विक्री कारखान्याशी संलग्न असलेला विक्री केंद्रातून केली जातात ज्या मुळे ग्राहक व विक्रेता दोघांचाही फायदा होतो. यामध्ये वाजवी दाम/भाव, मालाचा अस्सलपणा, ताजेपणा, त्याचा वापर कसा करावा या संबंधी अधिक चांगली माहिती या ठिकाणी मिळत असल्यामुळे अशी केंद्रे लोकप्रिय असतात. 

१. निविष्ठा खरेदी:

  • सामुदायिक खरेदी: मोठ्या प्रमाणात खरेदी करणाऱ्यांना नेहमीच खूप कमी दरामध्ये माल उपलब्ध होतो. सौदा करण्याची मोठी ताकत सामुदायिक खरेदीला उपलब्ध झाल्याने हे शक्य होते. याचा जास्तीत जास्त फायदा शेतकरी उत्पादक संस्था, औपचारिक / अनौपचारिक शेतकरी गट यांना करता येतो.
  • बऱ्याच मोठ्या ब्रँडेड उत्पादकांची - उत्पादक, C&F / सुपर डीस्ट्रीब्युटर, घाऊक विक्रेता आणि किरकोळ विक्रेता अशी पुरवठा साखळी असते. यामध्ये उत्पादनाच्या मूळ किंमतीमध्ये प्रत्येक घटकाचा खर्च व नफा मिळवला जातो व शेवटी ग्राहकासाठी विक्रीची किंमत काढली जाते. हि मूळ किंमतीच्या काही पट असू शकते. वितरणाची अशी साखळी असलेल्या ब्रँडेड उत्पादनांची खरेदी करताना घाऊक वितरकांकडून सामुदायिक, रोखीत / आगाऊ खरेदी केली तरच उत्पादने स्वस्त मिळू शकतात.   
  • खर्चावर नियंत्रण आणण्यासाठी, प्रत्यक्ष विक्रीसाठी भंडारच नको अशा प्रकारचा विचार अनेक उत्पादक हल्ली करतात व त्यासाठी ग्राहकाला थेट पुरवठ्याची व्यवस्था निर्माण करतात. थेट पुरवठ्यामुळे किरकोळ वितरक, घाऊक वितरक यांचे खर्च (व नफा) मध्ये बचत होते व ग्राहकाला पुष्कळ स्वस्तामध्ये वस्तू मिळू शकते. उदा: अमेझॉन, फ्लिपकार्ट अशा माध्यमातून होणारी विक्री.
  • वितरण साखळी व्यतिरिक्त उत्पादकाचा मोठा खर्च विक्री व्यवस्था व जाहिरातीवर देखील होतो. कल्पक / नाविन्यपूर्ण पद्धतीने कमी खर्चात डिजिटल मार्केटिंग चा वापर केला तर उत्पादकाला पुष्कळ कमी किंमतीमध्ये उत्पादने विक्री करणे शक्य आहे.

 

२. रास्त किंमत व दर्जा.

  • अनेक वेळेला ग्राहकाला खरेदी करायच्या वस्तूचा प्रकार माहिती असतो पण उपलब्ध अनेक उत्पादनांपैकी कोणते चांगले, कोणते स्वस्त, कोणते परिणामकारक याबाबत माहिती नसते. उत्पादनाच्या लेबल वर सर्व घटक पदार्थ लिहिणे बंधनकारक आहे. ह्या आधारे तुलना करता येते.  
  • अधिक माहिती मिळण्याचे सर्वसाधारण ठिकाण म्हणजे विक्री प्रतिनिधी अथवा विक्रेता/ दुकानदार. मात्र या दोघांनाही त्यांच्याकडे उपलब्ध असलेला मालच विकायचा असतो. म्हणूनच स्वतःचा फायदा करण्यासाठी अधिक माहिती ग्राहकानेच मिळवणे अपेक्षित आहे. ती मिळवणे फारसे अवघड नाही पण अभ्यास मात्र स्वत:च करावा लागतो.
  • उत्पादना बद्दल सखोल माहिती वेगवेगळ्या कंपनीचे माहितीपत्रक, इंटरनेट या मध्यमातून घेता येते. कंपनी प्रतिनधी अथवा दुकानदार यांच्याकडून सुद्धा तुमच्या प्रश्नांची योग्य माहिती मिळवणे हा तुमचा अधिकार आहे.

सदर लेखमालेतील लेख आवडला असल्यास इतरांना या लेखाची लिंक पुढे पाठवा तसेच या ब्लॉगला फॉलो (Follow) करा. Follow करण्यासाठी https://ecoagroservices.blogspot.com/ या लिंकला जा व पान उघडा. पानाच्या खालच्या उजव्या कोपऱ्यात  या चौकटीवर क्लिक आहेत्यावर क्लिक करा.  नवीन लेख प्रकाशित होताच त्याची सूचना तुम्हाला ई-मेल द्वारे प्राप्त होइल

लेखाबाबत काही प्रश्न / सूचना असल्यास आपण ecoagropune@gmail.com या ई-मेलच्या माध्यमातून आम्हाला पाठवू शकता.

Comments