गुणवत्तापूर्ण द्राक्ष उत्पादनात “SOMS”* ची भूमिका. (लेख क्रमांक ३८)

श्री रवींद्र थत्ते, 
संचालक, 
इको ऍग्रो ग्रुप, पुणे.

SOMS*: 
S:   विद्राव्य खते. 
O:  सेंद्रिय पदार्थ, खते व भू-सुधारके 
M:  सूक्ष्म अन्नद्रव्ये.
S:   वनस्पती जैव-उत्तेजक.



विषय - परिचय
  • द्राक्षासह सर्व पिकांमध्ये हे आता दिसून येते कि निव्वळ जोर खते अथवा विद्राव्य खतांच्या भरवश्यावर आपण सातत्याने, दर्जेदार व भरपूर उत्पादन घेऊ शकत नाही. 
  • प्रदूषण व खर्च कमी करण्यासाठी रासायनिक खतांचा कमीत कमी वापर, जमिनीतील सूक्ष्म जीवांचे संवर्धन व वृद्धी या मार्फत जमीनीचे आरोग्य सुधारणे, वेगवेगळ्या अजैविक ताणांचा मुकाबला करणे हि उद्दिष्टये देखील अत्यंत महत्वाची आहेत. 
  • म्हणूनच एकात्मिक SOMS हि संकल्पना आम्ही प्रस्तुत करत आहोत.
  • आपल्याला सांगायला आनंद होतो कि SFIA मार्फत अशा प्रकारच्या एकात्मिक वापरा संबंधी एक शोध प्रकल्प NRCG मार्फत घेण्याचे ठरले असून सप्टे – ऑक्ट २०२३ मध्ये गोडी छाटणी ते माल काढणी पर्यंत सर्व बाबींचे काटेकोर निरीक्षणे घेऊन त्याचे अवलोकन केले जाईल. 
  • सदर सादरीकरणामध्ये सखोल चिकित्सा नसून विचारात घेण्याच्या महत्वाच्या बाबी फक्त दिलेल्या आहेत.
विद्राव्य खते (WSF) - १
  1. अति शुद्ध घटकांचा वापर करून 100% पाण्यात विद्राव्य खतांची निर्मिती. 
  2. विद्राव्य खतांद्वारे, पीक वाढीच्या विविध अवस्थेत पोषक घटकांचे बदलत्या गरजा पूर्ण करणेस सोईचे जाते.
  3. कमीत कमी वेळेत, मोठ्या क्षेत्रावर अचूकतेने वितरण करता येते. 
  4. थेट मुळांच्या कार्य कक्षेत पीक पोषक घटक उपलब्ध होतात. 
  5. यातील बहुतेक खते हि आम्लधर्मीय असतात. 
  6. यामध्ये सोडियम व क्लोराईड या क्षारांचे प्रमाण नगण्य असते. 
  7. अधिक योग्य असणाऱ्या स्त्रोताची निवड करण्यास वाव मिळतो. जसे, नत्रामध्ये नायट्रेट, अमोनिकल अथवा अमाईड व स्फुरदामध्ये मोनो, डाय अथवा पोलिफोस्फेट.  
  8. कमी क्षारता (Salt Index) असलेल्या खतांची निवड करूता येते.    
  9. जमिनीला खत देण्याऐवजी थेट पिकाला उपलब्ध होईल असे (Tea Spoon Feeding) अन्नद्रव्य व्यवस्थापन म्हणजेच गोण्यांनी खत देण्याऐवजी चमचा चमचा खत देणे हि संकल्पना. 
  10. किमान वेळेत, कमाल फायदा. 
  11. उच्च खतवापर कार्यक्षमता. (FUE) * 
संदर्भ: https://agritech.tnau.ac.in/agriculture/agri_nutrientmgt_fertigation.html


खतांचा अधिक कार्यक्षम उपयोग होण्यासाठी महत्वाच्या बाबी - १
  1. 4R: Right Source/Rate/Time/Place – खताच्या कार्यक्षम वापरासाठी महत्वाचे. 
  2. जमिनीतून उपलब्ध होऊ शकणाऱ्या अन्नद्रव्यांचे प्रमाण बघून, गरजेनुसार योग्य तीच पोषण द्रव्ये वापरावीत. (माती, पाणी, पान-देठ परीक्षणानुसार)
  3. जमिनीत असून, अनुपलब्ध स्थितीतील पोषक तत्वांना उपलब्ध कसे करता येईल? उदा: जमिनीचा सामू कमी करूणे, सेंद्रिय कर्ब वाढवणे यासारखे दीर्घकालीन उपाययोजना करावी. 
  4. पान, काडी, ओलांडे या अवशेषांचा वापर करून त्यामधील पोषक तत्वांचा पुनर्वापर (recycle) करावा. 
  5. द्राक्ष वेलीची वाढ हि तापमान, आर्द्रता, सुर्याप्रकाश इत्यादी वातावरणाच्या घटकानुसार होते, त्यामुळे छाटणी नंतर अमुक दिवशी इतके खत वापरावे हि पद्धत योग्य नाही. आपल्या बागेतील द्राक्ष वाढीची परिस्थिती लक्षात घेऊन खते वापरणे इष्ट ठरते. 
  6. १७ पीक पोषण तत्वांमधील परस्पर संबंध उदा: Synergism (सकारात्मक युतीप्रभाव) व Antagonism (नकारात्मक युतीप्रभाव) चा अभ्यास तसेच जमीनीचे रासायनिक गुणधर्म जसे सामू, क्षारता, चुनखडीचे प्रमाण इत्यादींचा विचार करून वापर करणे. 
  7. जमिनीमार्फत दिलेल्या खतांच्या तुलनेत फवारणी द्वारे दिलेली खते हि १० ते २० पट अधिक कार्यक्षम असतात, तसेच ती जलद गतीने व पूर्णपणे उपलब्ध होतात. 
मुल्डरचा तक्ता

Synergism (सकारात्मक युतीप्रभाव): उदा: १ + १ = २ पेक्षा अधिक
Antagonism (नकारात्मक युतीप्रभाव): उदा: १ + १ = २ पेक्षा कमी

खतांचा अधिक कार्यक्षम उपयोग होण्यासाठी महत्वाच्या बाबी - २
  1. पीक वाढीवर प्रतिकूल परिणाम करणारे जमिनीचे गुणधर्म – उदा: क्षारता, उच्च सामू, जमिनीचा कठीण थर इ. कमी करण्याचा प्रयत्न करणे. 
  2. एखाद्या पीक पोषक तत्वाचा अतिरेक झाला तर, त्याचे अनिष्ट परिणाम अन्य पोषक तत्वांच्या उपलब्धतेवर होतात, त्यामुळे अनावश्यक वापर जरूर टाळावा.
  3. पीक वाढ अवस्थेनुसार पीक पोषक तत्वांची गरज भागवण्यासाठी ठराविक फोर्मुला अथवा ग्रेडचे रासायनिक खत शिफारशीत असते. वस्तुत: वैयक्तिक शेतकऱ्यासाठी असा कोणताही तयार फोर्मुला सुयोग्य असू शकत नाही, कारण प्रत्येकाची जमीन व त्यातील उपलब्ध पीक पोषक तत्वांची मात्रा, इत्यादी अनेक बाबी भिन्न असतात. त्यामुळे खरेतर शेतकऱ्याने माती, पाणी व पान-देठ परीक्षणाच्या आधारे स्वत:साठी योग्य मात्रा तयार करणे हेच योग्य.  
  4. तयार फोर्मुला मुळे जास्त वाढ/वाढ न होणे वगैरे अनेक दुष्परिणाम होऊ शकतात तसेच अनावश्यक खर्च सुद्धा होतो. 
  5. MAP, SOP, KNO3, MKP, Urea, Urea Phosphate, Phosphoric Acid, Ammonium Sulfate etc विद्राव्य खतांचा योग्य प्रमाणात वापर करून शेतकरी स्वत:च्या द्राक्ष बागेसाठी योग्य मात्रा तयार करू शकतो.
खतांचा अधिक कार्यक्षम उपयोग होण्यासाठी महत्वाच्या बाबी - ३ 
  1. द्राक्ष बागायतदारांना १७ पीक पोषण तत्त्वे व त्यांचे कार्य याबाबत माहिती आहेच. पण बऱ्याच बागायतदारांना फळांची घनता, टिकावूपणा यासाठी महत्वाचे असलेले कॅल्शियम, मुळांद्वारे अथवा फवारणीद्वारे फळांपर्यंत कसे पोहोचवायचे हे अवगत नसते. तसेच लोहाची कमतरता दिसते हे कळते पण ती कमतरता येउच नये अथवा लगेच दूर व्हावी याबाबत योग्य माहिती नसते व त्यामुळे उत्पादनात घट, अयोग्य व्यवस्थापन व अनाठायी खर्चास सामोरे जायला लागते. 
  2. कोणती व कोणत्या स्वरूपातील पोषक तत्वे कुठल्या परिस्थीतित कशा प्रकारच्या जमिनीसाठी वापरणे आवश्यक व श्रेयस्कर ठरते, हा निर्णय शास्त्रीय दृष्टीकोनातूनच घेणे गरजेचे आहे. उदा: 
  3. चुनखडी युक्त जमिनीमध्ये कॅल्शियम नायट्रेटचा वापर करावा का? 
  4. नायट्रेट नत्र वाढवणाऱ्या खतांचा Potassium/Calcium Nitrate चा वापर करवा का? आणि किती?  
  5. फवारणी द्वारे कोणते कॅल्शियम किती द्यावे?. 
  6. जमिनीच्या सामू (pH) प्रमाणे Redox Potential (Eh) हा पीक पोषक द्रव्यांच्या उपलब्धतेसाठी एक महत्वाचा मुद्दा आहे. या बाबत तज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे.  
खतांचा अधिक कार्यक्षम उपयोग होण्यासाठी महत्वाच्या बाबी - ४
  1. पिकाची जमिनीखालील वाढीबाबत (मुळांची वाढ/ कक्षा) बहुतेकांना फारशी माहिती नसते. त्याच बरोबर जमिनीची पाणी धारण करण्याची क्षमता हि माहित नसते. त्यामुळे ड्रीपवाटे खत देणे (Fertigation) हे अंदाजे केले जाते. त्यामुळे खत / पाण्याचा कार्यक्षम वापर होत नाही. 
  2. ड्रीपवाटे खते (Fertigation) रोज का आठवड्यातून एकदा द्यावीत या प्रश्नाला शास्त्रीय पद्धतीने उत्तरे शोधणे गरजेचे आहे.
  3. डोझिंग पंप,  A व B टॅंक चा वापर करून फेर्टीगेशन करावे म्हणजे सर्व बागेला एकसमान तीव्रतेचे द्रावण मिळू शकते. 
  4. सर्वात महत्वाचे म्हणजे – उत्पादन हे निव्वळ NPK खताच्या वापरावर अवलंबून नाही हे समजून घेतले पाहिजे – कारण – कोणतेही वनस्पतीचा पृथक्करण केले असता त्यामधील अन्नद्रव्यांचे प्रमाण सर्वसाधारणपणे पुढील प्रमाणे आढळते. 
वनस्पतीच्या शुष्क भागातील आवश्यक मुलद्र्व्याची टक्केवारी:

टीप: (१) नत्र हे एकमेव अ-खनीज पीक पोषक मूलद्रव्य असून हवेतून स्थिर होणारे नत्र हाच एकमेव नैसर्गिक स्त्रोत आहे. (२) सिलिकॉन, कोबाल्ट, सेलेनियम, सोडियम इत्यादी काही पिकांसाठी गुणकारी असल्यामुळे त्यांना फायदेशीर मूलद्रव्य असे संबोधले जाते.  

पीक पोषक तत्वांची उचल (Nutrient removal):
उत्पादन: 25 टन/हेक्टर - थॉम्पसन सीडलेस द्राक्षे

संदर्भ: Dr. B.S. BHARGAVA, Maharashtra State Grape Growers Association, Pune

खतांचा अधिक कार्यक्षम उपयोग होण्यासाठी महत्वाच्या बाबी - ५
CEC : धन आयन विनिमय क्षमता 
  • काही पीक अन्नद्रव्ये ऋणभारीत असतात उदा: नायट्रेट(NO3-) किंवा सल्फेट (SO4-2), क्लोरीन (Cl-) इत्यादी. चिकणमातीच्या कणांवरती हि चिकटून राहत नाहीत व पाण्याबरोबर त्यांचा निचरा होउन ऱ्हास होतो. मातीच्या कणांना धरून नसल्यामुळे ह्या ऋणभारीत आयनांचे मास फ्लो पद्धतीने परीवहन होते.
  • जमिनीतील सेंद्रिय पदार्थ व चिकणमातीच्या कणांवरती ऋण (-ve) विद्युत भार असतो. त्यामुळे पोटॅशियम (K+), कॅल्शियम (Ca+2), मॅग्नेशियम (Mg+2) आणि अमोनियम (NH4+) हि धन भारीत (+ve) अन्नद्रव्ये मातीच्या कणांभवती विरुद्ध भारामुळे तात्पुरत्या स्वरूपात चिकटून राहतात. 
  • वनस्पतीच्या मुळाला धन भारीत पीक अन्नद्रव्य घ्यायचे असेल तर त्यास समान भार असलेल्या दुसर्‍या धन-आयन बदली द्यावा लागतो. अशी अदलाबदल करण्यासाठी (H+) हा  धन-आयन जमिनीत मुळांद्वारे सोडून त्याबदल्यात एक पोटॅशियमच्या (K+) धन-आयन घेतला जातो. 
  • दोन धन भार (Ca+2) असलेली अन्नद्रव्य घेण्याकरिता, वनस्पतीला दोन हायड्रोजन (H+) धन-आयन तर तीन धन भार (Fe+3) असेल तर तीन हायड्रोजन (H+) धन-आयन देण्याची आवश्यकता असते. जितका धन भार जास्त (३+ भार) तितका तो जास्त ताकतीने मातीशी जोडला जातो. 

यासाठी कॅनोपी व्यवस्थापन द्वारे सर्वोत्तम प्रकाश संश्लेषण प्रक्रिया होणे व मुळांच्या कार्यक्षम क्रियेसाठी त्यांच्या भोवती प्राणवायू असणे गरजेचे आहे.

खतांचा अधिक कार्यक्षम उपयोग होण्यासाठी महत्वाच्या बाबी - ६
अचूक पीक पोषण व्यवस्थापनासाठी माती, पाणी आणि देठ परीक्षणाचे महत्व.
  • माती, पाणी व पानदेठ परीक्षण सातत्याने नामांकित विश्वसनीय प्रयोगशाळेकडूनच करावे.
  • नमुना घेण्याची / पाठवण्याची प्रक्रिया अगदी काटेकोरपणे पाळावी. 
  • प्रती वर्षी पान, देठ परीक्षणासाठी निवडलेल्या प्रातिनिधिक वेलीनमधूनच नमुना घ्यावा.
  • पानदेठ परीक्षण अहवाल नमुना काढण्याच्या २०-३० दिवस आधी वेलीमध्ये असणाऱ्या पोषक तत्वांचे प्रमाण दर्शवतो. तत्कालीन स्थिती कळण्यासाठी पानातील/ वेलीतील रसाचे परीक्षण (Sap analysis) योग्य ठरते. 
  • याशिवाय पानरसाचे pH, EC, Brix, P ,K, Ca, NO3 इत्यादी बाबी जागच्या जागी पॉकेट मीटर मार्फत तपासण्याची पद्धत विकसित आहे, त्यावरून काही पीक पोषण तत्त्वांचे प्रमाण व वेलीचे सुद्धा आरोग्य कळू शकते. 
  • पानरसाचा सामू कमी असेल तर त्याचा अर्थ Ca, Mg, K चे प्रमाण कमी तर NO3-N चे प्रमाण जास्त. अशा परिस्थितीत रोग व किडीचा प्रादुर्भाव वाढतो. (त्वरित फवारणी द्वारे उपाययोजना करता येते)
  • जमीनीचे आरोग्य तपासण्यासाठी अनेक पद्धती जगामध्ये वापरल्या जातात, जमिनीतील सेंद्रिय कर्ब, बुरशी व जीवाणूचे प्रमाण, विद्राव्य सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण इत्यादी तपासणी मार्फत याचे महत्व त्यांना पटले असून शाश्वत फायदेशीर शेतीसाठी ते त्याचा अवलंब करतात.
खतांचा अधिक कार्यक्षम उपयोग होण्यासाठी महत्वाच्या बाबी - ७
खतांमधील क्षार व त्याचे परिणाम
  • रासायनिक खतामधल्या क्षारामुळे परासरण दाब (ऑस्मोटिक प्रेशर) वाढतो. परासरण दाब वाढल्यामुळे जमीनीतील कमी दाबाचे पाणी, इतकेच नाही तर मुळातील पाणी उच्च दाबाकडील क्षार / खताकडे  जाते. त्यामुळे मुळे मरू शकतात. 
  • मुळामधील परासरण दाबा पेक्षा सभोवताली जास्त क्षारा मुळे उच्च परासरण दाब निर्माण झाल्यावर मुळातील पाणी बाहेर पडत असल्याचे दाखवले आहे. 

काही खतांचे सॉल्ट इंडेक्स:


द्राक्ष उत्पादनात जास्त खतांमुळे उद्भवणाऱ्या समस्या 
  • नत्राच्या (नायट्रेट आणि अमोनिकल) यांच्या अतिरेकामुळे नेक्रोसीस, वॉटर बेरी व मणी मऊ पडणे या समस्या उद्भवतात.   
  • मॉलिब्डेनमचे प्रमाण पुरेसे (०.१५ ते ०.५ ppm) नसेल तर NO३ नायट्रेटची पातळी वाढते व साठू लागते. त्यामुळे प्रोटीन / अमिनो असिड ची निर्मिती होत नाही. व प्रमाण पुरेसे (०.१५ ते ०.५ ppm) असले तरच नायट्रेट रिडक्टेज हे विकर तयार होते व सूर्य प्रकाश असताना तसेच Cu, S, Ca ची पातळी योग्य असली तर नायट्रेटची पातळी कमी करते. 
घट्ट मणी: (माल काढणीच्या वेळी) N-एकूण :< ०.७%; शुष्क पदार्थ - २०-२३% 

मऊ मणी: N-एकूण : > १.०%;  शुष्क पदार्थ -१०-१२%

सूक्ष्म पीक पोषक तत्वे (Micro-Nutrients)
  • मुख्य पीक पोषक तत्वांच्या तुलनेत अत्यंत कमी प्रमाणात लागत असूनही सूक्ष्म पीक पोषक तत्वे हि दर्जेदार व भरघोस उत्पादनासाठी अत्यंत महत्वाची आहेत.
  • सूक्ष्म पीक पोषक तत्वबाबत एक महत्वाचा मुद्धा म्हणजे कमतरता (deficiency) व विषदाहकता (toxicity) यामध्ये फार कमी अंतर आहे. म्हणूनच त्यांचा वापर जमीन, पाणी, पान-देठ परीक्षणानंतर गरजेनुसार करावा. 
  • गरजेनुसार पीक वाढ अवस्थेनुसार फवारणी द्वारे वापरणे अतिशय फायदेशीर.
  • एकमेकांच्या संपर्कात येऊन नकारात्मक युतीप्रभावाने निष्प्रभ होऊ नये, यासाठी चीलेटेड अन्नद्रव्यांचा वापर प्रामुख्याने जमिनीतून देण्यासाठी केला जातो. 
  • यामध्ये EDTA, DTPA, EDDHA, HEDP, Glycine (amino acid), Gluconate आदी प्रकार आढळून येतात. यापैकी EDTA, DTPA, EDDHA, HEDP हे कृत्रिम चीलेट यांचे दीर्घकाळ जैव विघटन होत नाही तसेच त्यांचा रेणूंचा आकार मोठा असल्याने पानांवाटे सहजासहजी शोषण होत नाही. 
  • Mn, Cu, Zn हे बुरशीनाशकाचे घटक असून पानावर भरपूर फवारले जातात. तरी ते वेलीअंतर्गत पोषक तत्वे म्हणून पुरेश्या प्रमाणात उपलब्ध आहेत का हे तपासणे गरजेचे असते. 
  • सूक्ष्म अन्नद्रव्ये विकरांच्या कार्यामध्ये आवश्यक असतात त्यामुळे निर्णायक अवस्थेत फवारणी करणे फायद्याचे ठरते.  
जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे महत्व - १  
  • शेतकरी सहसा जमिनीच्या जैविक गुणधर्माला विशेष महत्व देत नाहीत. 
  • चांगली जमीन = चांगले पीक ? का चांगले पीक = चांगली जमीन ?
  • दगड, मुरूम या पासून चांगली चांगली, सुपीक, सजीव जमीन कोण तयार करते ? 
  • वाढणाऱ्या वनस्पती, जमीनीमध्ये वाढणारी त्यांची मुळे, व मुळांभोवती वाढणारे सूक्ष्म जीव व सूक्ष्म जीव - मुळी यांच्या सतत सहयोगाने सुपीक जमीन तयार होते. 
जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे कार्य:
  • मातीच्या कणांची कणीदार रचना (aggregate) घडवणे व टिकवून ठेवणे. मातीची धूप होऊ देत नाही. 
  • या रचनेमुळे मातीमध्ये पोकळ्या निर्माण होऊन ऊन हवा खेळती राहणे, पाणी मुरणे या महत्वाची कार्ये घडतात. तसेच या कणांभोवती असलेल्या पोकळ्यांमध्ये सूक्ष्म जीवांचा अधिवास असतो.   
  • जमिनीखालील अन्नसाखळी मध्ये सहभागी असलेल्या हजारो प्रकारच्या सूक्ष्म जीवांसाठी अत्यावश्यक. 
  • पाण्याबरोबर पीक पोषक अन्नद्रव्यांचा ऱ्हास थांबवणे.  
  • पीक पोषक अन्नद्रव्यांचे स्थिरीकरण (Immobilization) व  खनिजीकरण (Mineralization) या दोन्ही प्रक्रिया सूक्ष्म जीवांच्या माध्यमातून होतात. 
  • Rhizosphere मधील सूक्ष्म जीवाणू यांचे मुळांसोबत रासायनिक पदार्थांच्या मार्फत संपर्क, संवाद आणि संदेश वहन होते व PGPR (Plant Growth Promoters and Regulators) ची निर्मिती होते. तसेच जैविक व अजैविक ताण सहन करण्यासाठी आवश्यक उपाय योजना तयार केल्या जातात.  
  • अनुपलब्ध अन्नद्रव्ये उपलब्ध करण्याकरता सेंद्रिय आम्ल पदार्थ निर्मिती करण्याचे संदेश दिले जातात (उदा: PSB, Sidrophores).
  • जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाचे प्रमाण चांगले असले तर रासायनिक/विद्राव्य खतांचा वापर अधिक कार्यक्षमतेने होतो.  
सुपीक नैसर्गिक जमिनीत असणाऱ्या सूक्ष्म जीवांचे प्रकार, आकार, विपुलता व प्रती एकर वजन खालील तक्त्यात दर्शवला आहे.  

खत, तणनाशक व इतर रसायनांच्या वापरामुळे हि जैव-विविधता व प्रजातींची संख्या झपाट्याने नष्ट होत आहे !


आच्छादन पिक / जमिनीवरती कायम आच्छादन असणे गरजेचे:


जमीनीमधील सेंद्रिय कर्ब वाढवता येते, पण त्यासाठी  
  • शून्य मशागत.
  • भर खतांचा / सेंद्रिय पदार्थांचा भरपूर वापर.
  • मल्च / जिवंत आच्छादन पिकांचा वापर.
  • फक्त द्राक्षघड व्यतिरिक्त वेलीचे बाकी सर्व भाग शेतात कुजवणे, आवश्यक आहे. 
जैव-उत्तेजके 
  1. जैव-उत्तेजके या वर्गात येणारी अनेक प्रकारची उत्पादने शेतकऱ्यांच्या परिचयाची आहेत मात्र त्यांना वर्ष २०२१ पासून खत नियंत्रण कायद्या अंतर्गत आणले आहे. 
  2. जैव-उत्तेजके हि खत, पेस्टीसाईड अथवा PGR नाहीत.  
  3. जैव-उत्तेजकांच्या वापराणे होणाऱ्या महत्वाच्या क्रिया:
    • खतांचा कार्यक्षम वापर.  
    • पिकाला अनुपलब्ध पोषक द्रव्यांचा कार्यक्षम पुरवठा
    • वेलीला अजैविक ताणांविरुद्ध सहनशील बनवते. (अति थंडी/उष्णता पाण्याची कमतरता)
    • द्राक्षाच्या दर्जा मध्ये वृद्धी 
    • मुळांची वाढ.
  4. महाग रासायनिक खतांचा वापर कमी करूनही उत्तम दर्जेदार व भरघोस उत्पादन मिळत असल्यामुळे युरोप, ब्राझील इत्यादी ठिकाणी शेतकऱ्यांची पसंती.
  5. जैव-उत्तेजकांचे वर्गीकरणामधील महत्वाचे काही घटक पुढील प्रमाणे:
    • वनस्पती अर्क (समुद्र वनस्पती)
    • ह्युमिक-फुल्विक
    • अमिनो असिड
    • सूक्ष्मजीवामार्फत निर्मित
  6. केंद्र शासनाच्या नियमावली प्रमाणे नोंदणी करणाऱ्या कंपन्यांना परवाना देण्यात येत आहे.  
जैव-उत्तेजक - खताची कार्यक्षमता वाढवते.  
  1. ह्युमिक आम्ल मुळे नत्र जमिनीत धरून ठेवले जाते व त्यामुळे त्याची  कार्यक्षमता मोठ्या प्रमाणात वाढते. जमिनीच्या सूक्ष्म रचनामध्ये सुधारणा घडते. 
  2. फुल्विक आम्ल हे उत्तम चिलेटिंग एजंट असून पीकांतर्गत वहन व खताची कार्यक्षमता वाढवतो. 
  3. काही समुद्र वनस्पतीच्या अर्कामध्ये अल्जीनेट, मॅनिटोल यासारखे पॉलिसायक्राइड हे देखील नैसर्गिक चिलेटिंग एजंट आहेत. तसेच, खताची उपलब्धता, आणि कार्यक्षमता वाढवण्याचे कार्य करते. यामधील सेंद्रिय घटकांमुळे जमिनीतील सूक्ष्म जीवांसाठी खाद्य म्हणून देखील कार्य करते. 
  4. अमिनो आम्ल यामध्ये देखील सेंद्रिय स्वरूपातील नत्र असतो जो जमिनीतील सूक्ष्म जीवांसाठी खाद्य म्हणून कार्य करतो. फवारणी द्वारे दिलेले अमिनो आम्ल यातील विविध अमिनो आम्ल हे पीक पोषणासाठी जलद उपलब्ध होतात व फळाचा आकार, वजन, रंग, व दर्जा सुधारण्याचे कार्य करतात.  
  5. जैव-उत्तेजकांमुळे खताचा कमी वापर करूनहि उत्तम दर्जेदार उत्पादन घेता येते.     
Root development of Grapes : Country (Peru)

प्रती मीटर मुळांची संख्या अधिक असेल तिथे उच्च उत्पादन मिळते असे शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झाले आहे. 

भरपूर व निरोगी मुळी खतांच्या उच्च कार्यक्षमतेसाठी आवश्यक:
  • आपल्याला चांद्रयान दिसते मात्र पायाखाली काय आहे हे कळत नाही. 
  • बहुतेक सर्व वनस्पतींमध्ये जमिनीवरील व जमिनीखालील वाढ हि सारखीच असते.
  • मुळीची चांगली वाढ म्हणजेच अधिक प्रमाणात पांढरी मुळी ज्यामधून दूरवरून अन्नद्रव्य, पाणी मिळते. 
  • वेलीची जमिनीवरील व जमिनीखालील वाढ हि एकमेकांशी निगडीत असून एकापाठोपाठ दुसरी वाढ घडते. म्हणजे, 
  • जमिनीवरील पानांची संख्या, आकार व शाखीय वाढ होते व त्या पाठोपाठ मुळांचा वाढीचा कालावधी येतो त्यांनतर परत शाखीय वाढ असे चक्र चालू असते.
  • पिकाने तयार केलेले पदार्थ जसे कर्बोदके, नत्र इत्यादी आवश्यक घटक मुळांमध्ये सुद्धा साठवले जातात.
  • मुळांची चांगल्या वाढीमुळे अजैविक ताणांविरुद्ध सहनशीलता वाढते.  
शेतकऱ्यांच्या पुढील आव्हाने 
  • सातत्याने दर्जेदार उत्पादन घेऊन फायदा कमवणे
  • उत्पादन खर्च कमी करणे 
  • जमिनीची सुपीकता टिकवणे 
  • रसायनांचा कमीत कमी वापर 
प्रस्तुत सादरीकरणामधील सर्व बाबींचा वापर केल्यास वरील आव्हानांवरती मात करणे शक्य होईल. 
धन्यवाद.

सदर लेखमालेतील लेख आवडला असल्यास इतरांना या लेखाची लिंक पुढे पाठवा तसेच या ब्लॉगला फॉलो (Follow) करा. Follow करण्यासाठी https://ecoagroservices.blogspot.com/ या लिंकला जा व पान उघडा. पानाच्या खालच्या उजव्या कोपऱ्यात  या चौकटीवर क्लिक आहेत्यावर क्लिक करा.  नवीन लेख प्रकाशित होताच त्याची सूचना तुम्हाला ई-मेल द्वारे प्राप्त होइल.

लेखाबाबत काही प्रश्न / सूचना असल्यास आपण ecoagropune@gmail.com या ई-मेलच्या माध्यमातून आम्हाला पाठवू शकता.

Comments