शेतीमध्ये खर्च करूनही शिल्लक राहत नाही, खर्च परवडत नाही, याविषयी बहुतेक शेतकऱ्यांची तक्रार असते व ती रास्तही आहे. शेतमालाला भाव किती असावा, उत्पादन खर्च कोणत्या पद्धतीने धरावा इत्यादी बाबींविषयी हा लेख नाही. हवामान व बाजार शेतकऱ्यांच्या हातात नसतात, तरी शेती हा एक व्यवसाय असून इतर व्यवसायाप्रमाणे त्यातून निव्वळ नफा मिळालाच पाहिजे.
शेतकरी जास्तीत जास्त उत्पादनांची अपेक्षा करून, ते मिळवण्यासाठी महागाचे बियाणे, तणनाशके, भरपूर खत, कीटक/बुरशी नाशक तसेच विविध टॉनिकचा सतत वापर करतो. यामध्ये आर्थिक दृष्टया कोणत्या निविष्ठा फायदेशीर आहेत याचा विचार शेतकरी सहसा करत नाही. हा विचार करणे अत्यंत गरजेचे आहे. दुसरे म्हणजे अपेक्षित किमान उत्पन्न (प्रती एकर उत्पादकता x किमान बाजारभाव) यापेक्षा जास्त खर्च निश्चितच टाळला पाहिजे.
खुल्या अर्थव्यवस्थेमध्ये, निविष्ठा उत्पादकांना स्वतःच्या उत्पादनांची जाहिरात व त्यापासून मिळणारा फायदा याचे प्रलोभन दाखवायची पूर्ण मुभा असते. ग्राहकाने चोखंदळपणे निवड करणे अपेक्षित असते. उदाहरणार्थ हजारो प्रकारचे साबण / शाम्पू / क्रीम / सौंदर्य प्रसाधने इत्यादी मधून ग्राहक त्याच्यासाठी उपयोगाचे तसेच खिशाला परवडणारे उत्पादन निवडतो. त्यापासून नक्की किती फायदा मिळतो हे ग्राहकच ठरवतो. परंतु, या चैनीच्या वस्तू झाल्या. शेती निविष्ठांची निवड करताना त्यापासून नक्की किती फायदा अथवा उत्पादनांत / दर्जात वाढ मिळते हे तपासले जाते का ? वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक निविष्ठा जसे बियाणे, खत, कीटक / बुरशी / तण नाशके, PGR, टॉनिक यापासून उत्पादनात व दर्जात वाढ / मजुरी किंवा इतर बाबतीत बचत होते का? त्याबाबत आपण समाधानी आहात का ? त्यांच्या वापरातून तुम्हाला अधिक पैसे मिळतात का? हे बघणे अत्यंत गरजेचे आहे.
शेतकऱ्यांनी
खालील बाबींवर विचार करावा:
- संकरीत का उन्नत का स्वतःचे बियाणे?, बियाणांचे एकरी प्रमाण, त्याची किंमत, साधारण उत्पादकता, व त्या मालाला मिळणारा सर्वसाधारण बाजार याबाबत, वाण निहाय विचार करून निर्णय घ्यायला पाहिजे. प्रत्येक वेळेला महागडे बियाणे हेच सर्वाधिक फायदेशीर आहे का? हे तपासले पाहिजे.
- सर्वात कमी खर्चांत नत्र, स्फुरद, पालाश व सूक्ष्म अन्नद्रव्ये कोणत्या खतांपासून मिळतात?. विद्राव्य खते वापरताना ग्रेड प्रमाणे त्यातील नत्र, स्फुरद, पालाशचे प्रमाण व दर तपासून खरेदी करावी. युरिया, पोटॅशियम नायट्रेट, पोटॅशियम सल्फेट, मोनो अमोनियम फॉस्फेट, मोनो पोटॅशियम फॉस्फेट, अमोनियम सल्फेट, कॅल्शियम नायट्रेट, मॅग्नेशियम सल्फेट, फॉस्फरिक आम्ल इत्यादी पासून शेतकरी त्याला हवा तो नत्र, स्फुरद, पालाश चा फॉर्मुला (ग्रेड) बनवू शकतो, व तो बाजारातील तयार खताच्या फॉर्मुलापेक्षा स्वस्त पडतो.
- कीड-रोग ओळखून जास्त प्रादुर्भाव असल्यास उपाययोजना केली जाते, का कीड-रोग येण्यापुर्वीच प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून फवारणी केली जाते ?.
- शेणखत/पेंड/साखर कारखान्यातील खत बाहेरून विकत आणण्या ऐवजी आपल्या शेतातील सेंद्रिय पदार्थ वापरून कंपोस्ट तयार करता का?
- जमीनीचे आरोग्य सुधारण्यासाठी दीर्घकाळाची गुंतवणूक करायची का तऱ्हेतऱ्हेची टॉनिक वापरून खर्च करत राहायचे?
मुळांच्या
वाढीसाठी |
सेटिंग साठी |
उन्हाचा तडाखा रोखण्यासाठी |
अधिक फुटव्यांसाठी |
फळाचा आकार
वाढण्यासाठी |
प्रथिन / स्टार्च निर्मिती साठी |
शेंडा
वाढण्यासाठी |
फळाला रंग
येण्यासाठी |
विकरांना सक्रिय करण्यासाठी |
पानांचा आकार
वाढण्यासाठी |
फळाची गोडी
वाढण्यासाठी |
वाढीला चालना
देण्यासाठी |
हिरवा रंग/काळोखी
वाढवण्यासाठी |
एकसारखा माल लागण्यासाठी |
रोगप्रतिकारक
क्षमता वाढवण्यासाठी |
फुल गळ होऊ नये
म्हणून |
टिकवणक्षमता
वाढवण्यासाठी |
बाष्पोउत्सर्जन रोखण्यासाठी |
अधिक फुले
लागण्यासाठी |
अजैविक ताण
निवारण्यासाठी |
उन्हाचा तडाखा रोखण्यासाठी |
अधिक मादी फुले
लागण्यासाठी |
बाष्पोउत्सर्जन
रोखण्यासाठी |
![]() |
(आकृती १) |
रासायनिक खताचा वापर करताना, वरील सिद्धांत फार महत्वाचा आहे. कारण, अधिकतम वापर हा काही मर्यादेपर्यंतच उत्पादकता वाढवतो. त्यापुढील वापराने उत्पादन वाढत तर नाहीच, परंतु अति वापराने घट पण होऊ शकते. (आकृती २)
![]() |
(आकृती २) |
आकृती २ मध्ये दाखल्याप्रमाणे थांबण्याची वेळ 'अ' आहे. 'अ' पासून 'ब' पर्यंत अधिक वापर केल्याने कोणताही फायदा मिळत नाही. उलट खर्च, श्रम व वेळ वाया जातो. एका अभ्यासानुसार, बहुतेक जण 'क' बिंदूला पोहचल्यावर अधिक वापर बंद करतात.
जस्टस वॉन लेबिग – याच्या सिद्धांताप्रमाणे जमिनीमध्ये कमतरता असलेला घटक उत्पादन वाढीला प्रतिबंध करतो. त्यामुळे शेतीमध्ये उत्पादन रोखणारे घटक खताच्या स्वरूपातून उपलब्ध करणे गरजेचे असते (आकृती ३).
![]() |
(आकृती ३) |
![]() |
(आकृती ४) |
इतर देशांच्या तुलनेत भारतामध्ये रासायनिक खते विशेषत: युरिया (नत्र) स्वस्त आहे. त्यामुळे त्याचा अति वापर केला जातो. मात्र त्यापासून अधिक / वाढीव आर्थिक फायदा मिळतो का हे तपासणे गरजेचे आहे. पालाश खत हे विलासी उपभोगासाठी प्रसिद्ध आहे. म्हणजेच जास्त वापरल्याने पीक ते स्वीकारते, पण अल्प प्रमाणात वाढीव फायदा देते. त्यामुळे कुठे थांबायचे हे कळणे आर्थिक दृष्टया महत्वाचे आहे.
उत्पादकता किती असावी? आपण नेहमी शेतीमधील प्रगत चीन/पंजाब मध्ये भाताचे,कपाशीचे,गव्हाचे इतके टन प्रती एकर उत्पादन मिळते असे वाचतो व त्या तुलेनेत आपली उत्पादकता इतकी कमी का? हा प्रश्न पडतो. इतर व्यवसायाप्रमाणे शेतीमध्ये उच्चतम कार्यक्षमता असावी, याबाबत कोणतेच दुमत नाही. पण कोरडवाहूची तुलना बागायतीशी होऊ शकत नाही, तसेच हवामान, जमीन इत्यादींमुळे उत्पादन क्षमतेत पुष्कळ तफावत आढळते. उत्पादकता रोखणाऱ्या बाबींचा विचार करून, कोणत्या बाबींमुळे अधिक फायदा मिळेल हेच बघणे गरजेचे आहे. शेतकऱ्याने प्रथम स्वतःचा पोशिंदा व त्यानंतर जगाचा पोशिंदा बनायचे आहे. सरकार तसेच विविध कंपन्या उत्पादन वाढीबाबत, तंत्रज्ञानाबाबत सल्ला देतात, पण विभागनिहाय शेतकऱ्याने काय व किती वापरणे आर्थिक दृष्टया फायदेशीर आहे हे सांगत नाहीत.
एका उदाहरणाचा विचार करू: भात पिकाला झिंकची गरज असते. हे झिंक कोणत्या स्वरुपात द्यावे? एकरी किमान १० किलो झिंक सल्फेट अथवा १-२ किलो १२% झिंक EDTA जमीनीतून वापरायची शिफारस केली जाते. इतके झिंक जमीनीतून देण्याच्या तुलनेत पुनर्लागवडीच्या वेळेला १% झिंक सल्फेटच्या द्रावणामध्ये ५ मिनिट साठी मुळे बुडवली तरी फार मोठा फायदा मिळतो, तसेच हा सर्वात कमी खर्चाचा उपाय ठरतो. जमीनीतून दिलेले खत कधी व किती प्रमाणात पिकाला उपलब्ध होईल हे सांगता येत नाही. जमीनीतून दिलेल्या खताच्या तुलनेत, पानावाटे दिलेल्या खताची कार्यक्षमता जास्त असते. शिवाय गरजेच्या वेळेला ते हमखास उपलब्ध होते. मात्र अनेक शेतकरी, पारंपारिक पद्धत म्हणून खूप मोठ्या प्रमाणात सूक्ष्म अन्नद्रव्ये जमिनीतून देतात शिवाय फवारणी करतात.
याच प्रमाणे अनेक शेतकरी रासायनिक खते व जीवाणू खते (उदा: मायकोरिझा, रायझोबियम, अझोटोबॅक्टर अझोस्पिरिलम, PSB, KSB इत्यादी) या दोन्हींचा वापर करतात. जमिनीमध्ये नत्रयुक्त रासायनिक खत पुरेसे उपलब्ध असेल तर, नत्र स्थिर करणारे जीवाणू कार्य करत नाहीत व त्यावर केलेला खर्च वाया जातो. तसेच मायकोरिझा / PSB हे सुद्धा रासायनिक स्वरूपातील स्फुरद उपलब्ध नसले तरच कार्यरत होतात.
विविध स्वरूपातील सूक्ष्म अन्नद्रव्ये बाजारात उपलब्ध आहेत. उदाहरणार्थ: सल्फेट, चीलेट, ऑक्साईड, ग्लुकोनेट, अमिनो ॲसिड, नॅनो खते इत्यादी. यांच्या गुणधर्मामध्ये, कार्यक्षमतेमध्ये, उपयुक्ततेमध्ये, वापरण्याच्या पद्धतीमध्ये फरक आहेत. ते वापरताना त्यांच्यापैकी आर्थिक दृष्टया फायदेशीर कोणता हे ओळखण्याची जबाबदारी ग्राहकाची आहे. कोणीही ग्राहक निव्वळ उच्च तंत्रज्ञानासाठी उत्पादन विकत घेत नसतो, तो ते त्याच्या उपयुक्ततेसाठी व आर्थिक फायद्यासाठी खरेदी करतो. यामुळे, योग्य ते प्रश्न विचारून स्वत:ची खात्री पटवून मगच खरेदी करावे. (विविध उत्पादनांमधील फरक लेख क्रमांक २४ " पिकाच्या उत्पादन वाढीसाठी अन्नद्रव्य फवारणीचे महत्व व ती कशी वापरावीत" यामध्ये दिलेले आहेत)
कोणत्याही उत्पादनातील सक्रीय घटक किती व कोणता?, त्याची कार्यक्षमता किती?, तसेच किंमत x वापरायचे प्रमाण किती?, या बाबत खात्रीशीर माहिती घेऊनच खरेदी करणे इष्ट आहे. उपलब्ध उत्पादनांची तुलनात्मक माहिती घेतल्याशिवाय वापर केल्यास आर्थिक नुकसान होऊ शकते.
I. कीटक/बुरशी/तण नाशक, रासायनिक खत तसेच मनुष्य अथवा जनावरांची औषधे एवढेच नव्हे तर प्रत्येक खाद्यपदार्थाच्या वेष्टनावर उत्पादनातील घटकांबाबत सर्व माहिती लिहिणे बंधनकारक आहे. मात्र काही जैविक, जैव-उत्तेजक, टॉनिक, स्टीकर या उत्पादनावर घटक पदार्थांबाबत माहिती दिल्याचे दिसून येत नाही. अशा प्रकारची माहिती शेतकऱ्यांना (ग्राहकांना) मागण्याचा अधिकार आहे. व्यावसायिक गोपनीयतेच्या सदराखाली अशी माहिती लपवता येत नाही. मात्र शेतकऱ्यांनी निविष्ठा वरील लेबल नीट वाचायची सवय लावली पाहिजे. त्यावरूनच तुलना करता येते. अनेक वेळा संभ्रम निर्माण करण्यासाठी अथवा माहिती समजू नये यासाठी घटक पदार्थांची माहिती वेगवेगळ्या स्वरुपात दिली जाते. द्रव स्वरूपातील मिश्र घटकांची टक्केवारी देताना खालील प्रमाणे संज्ञा वापरल्या जातात. (तक्ता क्रमांक १)
परिमाण / संज्ञा |
प्रकार |
उदाहरण |
(वेट/व्हॉल्यूम) Weight
/ Volume (w/v)
|
वजन/घनफळ (घन
रसायन द्रव पदार्थात मिसळले तर) |
१० ग्रॅम घन पदार्थ (मीठ) + पुरेसे* मिली पाणी = १०० मिली द्रावण = १०% (w/v) द्रावण. |
(वेट/वेट) Weight
/ Weight (w/w)
|
वजन/वजन (येथे
दोन्ही द्रव्यांचे वजन मोजले जाते घनफळ नाही) |
३० ग्रॅम फॉस्फोरिक
ॲसिड + ७० ग्रॅम पाणी = १०० ग्रॅम द्रावण = ३०% फॉस्फोरिक ॲसिड (w/w) |
(व्हॉल्यूम/व्हॉल्यूम) Volume/Volume (v/v)
|
घनफळ/घनफळ (दोन द्रव्य
असताना) |
५० मिली इथेनॉल + ५० मिली पाणी = १०० मिली इथेनॉलचे ५०% (v/v) द्रावण. |
वरील तक्त्याचे अवलोकन केले तर एक गोष्ट लक्षात येईल कि वेट/व्हॉल्यूम आणि व्हॉल्यूम/व्हॉल्यूम यामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत पडते. ती कशी, ते आपण बघूया.
अ. ८०० मिली इथेनॉल जर २०० मिली पाण्यात मिसळली तर ते द्रावण ८०% (व्हॉल्यूम/व्हॉल्यूम) असे तयार होते.
आ. इथेनॉलची घनता पाण्यापेक्षा कमी असल्यामुळे, १००० मिलीचे द्रावण वेट/व्हॉल्यूम पद्धतीने तयार करायचे झाल्यास ७०० ग्रॅम इथेनॉल + पुरेसे*पाणी = १००० मिली = ७०% (वेट/व्हॉल्यूम) इथेनॉल.
म्हणजेच ८०% (व्हॉल्यूम/व्हॉल्यूम) इथेनॉलच्या द्रावणामध्ये निव्वळ इथेनॉलचे प्रमाण ८०० मिली तर ७०% (वेट/व्हॉल्यूम) इथेनॉलच्या द्रावणामध्ये निव्वळ इथेनॉलचे प्रमाण ७०० ग्रॅम = ८८७ मिली इतके आहे. या दोन द्रावणाच्या पद्धतीमध्ये हा फरक पडतो. म्हणूनच लेबल नीट वाचावे.
II. भारतासारखे काही देश लिटर, मीटर, किलो, हेक्टर मध्ये मोजमाप करतात तर अमेरिकेत अद्याप पौंड, इंच, गॅलन, वापरले जाते. त्याच प्रमाणे पीक अन्नद्रव्यांचे प्रमाण कोणत्या स्वरुपात लिहावे याबाबत भारतामध्ये स्पष्ट संकेत असून ते शास्त्रज्ञ, शासकीय संस्था व खत उत्पाद्कांवरती बंधनकारक आहे. या पद्धतीमुळे, देशभर एकवाक्यता राहते वा संभ्रम निर्माण होत नाही. तथापि, अनेक वेळा अन्नद्रव्यांचे प्रमाण दर्शवताना ती मुळ अन्नद्रव्ये म्हणजेच कॅल्शियम (Ca) / मॅग्नेशियम (Mg) या स्वरुपात न देता ती Cao, Mgo या ऑक्साईड स्वरुपात दिली जातात.
तक्ता क्रमांक २ मध्ये अन्नद्रव्ये कोणत्या स्वरुपात दर्शवली पाहिजेत, तसेच ती दुसऱ्या परिमाणाप्रमाणे असल्यास, त्यांचे रुपांतर कसे करायचे ते दिले आहे.
अन्नद्रव्ये |
रुपांतर |
||
रकाना १ |
रकाना २ |
रकाना ३ |
|
भारतामध्ये या स्वरुपात
अन्नद्रव्ये दर्शवली जातात |
रकाना २ चे रुपांतर रकाना
१ मध्ये करण्यासाठी रकाना २ ला रकाना ३ ने गुणावे. |
गुणक |
|
नत्र |
N |
NO3 |
०.२२५ |
स्फुरद |
P205 |
P |
२.२९५ |
पालाश |
K20 |
K |
१.२०४ |
कॅल्शियम |
Ca |
CaO |
०.७१४ |
Ca |
CaCO3 |
०.४०० |
|
|
Mg |
MgO |
०.६०३१ |
Mg |
MgCO3 |
०.२८८ |
|
|
S |
SO3 |
०.४०० |
S |
SO4 |
०.३३३ |
|
|
Fe |
Fe2O3 |
०.६९९ |
Fe |
FeO |
०.७७७ |
|
झिंक |
Zn |
ZnO |
०.८०३ |
मॅंगनीज |
Mn |
MnO2 |
०.६३१ |
ताम्र |
Cu |
CuO |
०.७९८ |
बोरॉन |
B |
B2O3 |
०.३१ |
मोलिब्डेनम |
Mo |
MoO3 |
०.६६६ |
क्लोरीन |
Cl (क्लोराइड) |
Cl2 क्लोरीन |
२ |
निकेल |
Ni |
NiO |
०.७८५ |
सिलिकॉन |
Si |
SiO2 |
०.४६७ |
कोबाल्ट |
Co |
CoO |
१.२७१ |
सोडीयम |
Na |
Na2O |
०.७४१ |
III. काही ठिकाणी अन्नद्रव्यांचे प्रमाण ppm मध्ये दिलेले असते. यासाठी १०,००० ppm = १% हे गुणोत्तर लक्षात ठेवावे.
IV. लेबल वर अनेक वेळेला q.s. असे लिहलेले असते याचा अर्थ Quantum satis म्हणजेच सोप्या भाषेत घनफळा साठी पुरेसे* पाणी म्हणजेच घटक पदार्थ सोडून बाकी सर्व पाणी.
V. अनेक वेळेला द्रव स्वरूपातील उपलब्ध पदार्थ हा १००% असल्याचा दावा केला जातो. पण प्रश्न येतो कि त्यातील पाण्याच्या प्रमाणाचे काय? १००% असण्यासाठी, त्यातील घटक पदार्थ हा निसर्गत: द्रव स्वरुपात असायला हवा.
VI. अनेक उत्पादनांवर .....base असे लिहिलेले असते. पण यात ना घटकाचे पूर्ण नाव दिलेले असते ना बेस (base) सोडून इतर कोणता पदार्थ आहे याची माहिती दिलेली असते.
लेबल वरती संपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे तरच शेतकरी शेतीतील खर्च कमी करून रासायनिक अवशेषांचे व्यवस्थापन आणि ग्राहकांना घातक रसायन विरहीत अन्नपदार्थ देऊ शकतो.
शेतकऱ्यांनी
वैयक्तिकरित्या कोणत्या गोष्टी केल्याने खर्च कमी होऊ शकेल याचा आपण विचार करूया.
- सामुदायिक खरेदी: तेच पीक, तोच हंगाम, त्याच गावाचे सर्व शेतकरी जरी पिकवत असले तरी प्रत्येक जण निविष्ठांची खरेदी स्वतंत्रपणे करतो. गटाने, शेती उत्पादक कंपनीने अथवा सामुदायिकरित्या खरेदी केली तर किमतीमध्ये मोठा फरक निश्चित पडू शकतो. याशिवाय, खतासारख्या वजनदार वस्तू बांधापर्यंत येऊ शकतात.
- रोखी मध्ये खरेदी: रोख खरेदी केल्यास, किमतीमध्ये १०% ते २५% पर्यंत फरक पडू शकतो. पीक कर्जाचा योग्य विनियोग केल्यास खर्च निश्चित कमी होतील. उच्च प्रतीच्या ब्रँडेड निविष्ठा कमी किमतीत खरेदी करता येतील.
- कमीत कमी फवारणी: पीक संरक्षणावरती मोठा खर्च केला जातो व तो पूर्णपणे टाळणे शक्य नाही. मात्र नुकसानीची आर्थिक पातळी हा निकष क्वचितच वापरला जातो. त्यामुळे रोग अथवा कीडीचे शेतात कुठेतरी लक्षण दिसले तरी शेतकरी भीतीपोटी लगेच फवारणी करतो. वस्तुतः महत्वाच्या कीड / रोगांसाठी शास्त्रज्ञांनी नुकसानीच्या आर्थिक पातळी चे निकष निश्चित केले आहेत (ETL). कीड-रोगापासून आर्थिक नुकसानीची शक्यता नसताना आपण फवारणी केली तर तोटाच पदरी पडेल. याशिवाय, निसर्गातील परोपजीवी कीड / विरोधी बुरशी किंवा जीवाणू यांना कामांची संधी न देता त्यांनाही मारले जाते. महत्वाच्या पिकावरील किडींसाठी आर्थिक नुकसानीची पातळी तसेच एकात्मिक कीड-रोग व्यवस्थापन पद्धतीबद्दल माहिती https://farmer.gov.in/ipmpackageofpractices.aspx या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
- उपयोगी किड्यांना हानी पोहचू न देणे: निसर्गामध्ये पिकास हानीकारक किडींची संख्या मर्यादित ठेवण्यासाठी भक्षक व परोपजीवी किडीं उपलब्ध असतात. तण/कीटक/बुरशी नाशक यांच्या फवारणीने त्यांच्या जीवन चक्रावरती दुष्परिणाम होतो, व त्यामुळे पिकास हानीकारक किडींची संख्या वाढते. एकात्मिक / जैविक कीड नियंत्रणाच्या पद्धतीने रासायनिक कीटक नाशकांची फवारणी न करता काही किडींमध्ये नियंत्रण शक्य आहे.
- मधमाश्यांमुळे परागीकरण होऊन उत्पादनात वाढ होते: नवीन संशोधनानुसार मधमाशी मार्फत परागीकरण आवश्यक नसलेल्या ७५% पिकांमध्ये देखील मधमाशीच्या अस्तित्वाने अनेक फायदे होतात असे दिसून आले.
- बांधावर तसेच पिकांच्या ओळींमध्ये विविध वनस्पती वाढू देणे: सापळा पीक / विविध वनस्पती उपलब्ध असल्याने मुख्य पिकावरील किडींचा प्रादुर्भाव कमी होतो. उदा: गाजर, मोहरी, उडीद, मका, बडीशेप, जिरे, लसून घास, घेवडा इत्यादी.
- कीटक / बुरशीनाशक यांचे सक्रीय घटक, कार्यप्रणाली (mode of action) व प्रतिकारशक्ती: कीटक/बुरशीनाशक यामधील सक्रीय घटक कोणते व त्यांची कार्यप्रणाली (mode of action) काय आहे हे जाणून घेणे फार गरजेचे आहे. अन्यथा वेगवेगळ्या ब्रँडची पण तोच सक्रीय घटक असलेले उत्पादने वापरली जातात. वारंवार तेच सक्रीय घटक वापरल्याने प्रतिकारशक्ती निर्माण होते, व कीड / बुरशीनाशकाची जास्त मात्रा वापरूनही कीड/रोग आटोक्यात येत नाही. सक्रीय घटकांच्या व्यतिरिक्त त्यांची कार्य प्रणाली पण समजून घेणे गरजेचे आहे. कारण वेगवेगळे सक्रीय घटक असलेली कीड / बुरशीनाशकाची कार्य प्रणाली जर सारखीच असली तर विविध सक्रीय घटक वापरूनही कीड/बुरशी प्रतिकारक्षम बनते. सक्रीय घटक व त्यांची कार्य प्रणाली दर्शवणारी वेबलिंक दिली आहे – जिज्ञासूंना खालील दिलेल्या वेबलिंकवरून सखोल माहिती घेता येईल.
https://www.frac.info/docs/default-source/publications/frac-code-list/frac-code-list-2021--final.pdf?sfvrsn=f7ec499a_2
https://www.frac.info/docs/default-source/publications/frac-list-of-fungicide-common-names/frac-list-of-fungicide-common-names-(2016v2).pdf?sfvrsn=ff7f4a9a_2
सदर लेखमालेतील लेख आवडला असल्यास इतरांना या लेखाची लिंक पुढे पाठवा तसेच या ब्लॉगला फॉलो (Follow) करा. Follow करण्यासाठी https://ecoagroservices.blogspot.com/ या लिंकला जा व पान उघडा. पानाच्या खालच्या उजव्या कोपऱ्यात
या चौकटीवर क्लिक आहे, त्यावर क्लिक करा. नवीन लेख प्रकाशित होताच त्याची सूचना तुम्हाला ई-मेल द्वारे प्राप्त होइल.
लेखाबाबत काही प्रश्न / सूचना असल्यास आपण ecoagropune@gmail.com या ई-मेलच्या माध्यमातून आम्हाला पाठवू शकता.
लेखाबाबत काही प्रश्न / सूचना असल्यास आपण ecoagropune@gmail.com या ई-मेलच्या माध्यमातून आम्हाला पाठवू शकता.
फारच छान लेख.शेतकर्याना समजेल अशा भाषेत शब्दान्कन.
ReplyDeleteधन्यवाद
Deleteप्रत्येक गोष्टीचा सांगोपांग विचार करून अभ्यासपूर्ण लेख. सध्या prevention is greater than cure या उक्तीप्रमाणे केवळ रोग येईल या भितीपोटी अनावश्यक औषधांचा मारा केला जातो आणि खर्च वाढवला जातो.शेवटी गोळाबेरीज करतो तेव्हा वेळ निघून गेलेली असते.
ReplyDeleteधन्यवाद
DeleteNicely written, Well explained and easy to understand . Excellent Article
ReplyDeleteधन्यवाद
Deleteफारच छान, सहज सुगम भाषेत लिहितोस रवी, अभिनंदन
ReplyDeleteछान माहिती, शेतकऱ्यांना समजेल असे लेखन
ReplyDeleteधन्यवाद
Deleteधन्यवाद
ReplyDeleteVery important article. Every farmer should act wisely during purchase of agro inputs.
ReplyDelete