पीक उत्पादन कार्यक्षमता (लेख क्रमांक ३१ )

श्री रवींद्र थत्ते, 
संचालक, इको ऍग्रो ग्रुप,
 पुणे.

काही वर्षांपूर्वी आपल्या काही नेत्यांना कोकणचा कॅलिफोर्निया करू असे सांगायची हौस होती. बर झाले, लोकांना त्याचा विसर पडला, कारण गेल्या २० वर्षापासून कॅलिफोर्निया मध्ये पाण्याचा दुष्काळ आहे. कॅलिफोर्निया हे राज्य अमेरिकेतील सर्वाधिक फळे व भाजीपाला निर्माण करणारे राज्य आहे. बदाम, पिस्ते, अक्रोड, बेदाणे, स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी, रास्पबेरी इत्यादी उच्च भावाने विकणाऱ्या फळांची निर्मिती तेथे होते. सिंचनाची व्यवस्था भूजलावरतीच अवलंबून आहे. पाण्याच्या दुर्भिक्षामुळे अनेक प्रकारचे काटकसरीचे उपाय तेथे अवलंबले आहेत.

पाण्याची कार्यक्षमता सुधारणे म्हणजेच, कमीत कमी पाणी वापरून नेहमी इतके अथवा अधिक उत्पादन घेणे (more crop per drop)यासाठी जमीनीच्या प्रकार व मगदूर, मुळांची वाढ भूपृष्ठाखाली किती इंचावरती आहे?, जमीनीतील पाण्याचा अंश किती आहे?, ते पाणी खेचण्यासाठी किती दाब लागेल?, बाष्प-उत्सर्जन किती होते आहे?, पिकाच्या वाढीची अवस्था कोणती आहे?, जमिनीचे तापमान/क्षारता काय आहे? याचा विविध सेन्सरच्या माध्यमातून अचूक अभ्यास करून पिकाला जेमतेम पुरेसे अथवा न्युनतम पाणी दिले जाते. या व्यतिरिक्त फळ वाढीच्या अवस्थेमध्ये पुरेसे पाणी तर विश्रांती/इतर काळामध्ये अतिशय कमी पाणी, मल्चिंग इत्यादी पद्धतींचा वापर करून काटकसरीने पाणी वापरले जाते.

१ किलो अन्नधान्य तयार करण्यासाठी पिकाला किती पाणी लागते, या बाबत तक्ता लेखाच्या शेवटी दिलेला आहे. (तक्ता क्रमांक १)

कमीत कमी साधन सामुग्रीचा वापर करून उत्तम उत्पादनांची निर्मिती करणे म्हणजे उच्च कार्यक्षमता प्राप्त करणे. उत्कृष्ट व्यवस्थापन कौशल्याचा वापर करून, अतिशय कमी साधन सामुग्री वापरून निर्मिती करणे हे अत्यंत महत्वाचे आहे. एका सोप्या उदाहरणाचा आपण विचार करू. समजा तुमच्याकडे एक दुचाकी आहे. सध्या पेट्रोल १०० रुपये लिटर आहे व तुमची दुचाकी लिटर मध्ये पन्नास किलोमीटर चालते म्हणजेच २ रुपये प्रती किलोमीटर. जर टायर मधील हवेचा दाब योग्य ठेवला, चांगल्या ठिकाणी पेट्रोल भरले, व वाहन योग्य पद्धतीने वापरले तर तुमची दुचाकी किमान ५५ किंवा ६० किलोमीटर प्रती लिटर चालेल. म्हणजेच प्रती लिटर १.८१ ते १.६६ इतका फरक पडेल. याला व्यवस्थापन कौशल्याचा वापर करून उच्च कार्यक्षमता प्राप्त करणे म्हणतात.

शेतीमध्ये अशा अनेक कार्यक्षमता वाढवणाऱ्या बाबींचा वापर आपण करू शकतो. यामुळे वेळ, पैसा व श्रम या तिन्ही मध्ये बचत होऊन अधिक फायदा मिळू शकतो जसे, सिंचनाची कार्यक्षमता, खत वापरण्याची कार्यक्षमता वाढवणे शक्य आहे. तसेच फवारणीच्या खर्चा मध्ये, (फवारणी करण्याची पद्धत, कार्यक्षमता व त्यासाठी येणारा खर्च) कीड / रोग निर्मुलनासाठी आपण कोणत्या प्रकारचे औषध व किती वेळा वापर करतो. यामध्ये वेळ, पैसा व श्रम याची बचत निश्चित पणे करता येईल.

अनेक वेळा शेतकरी एकामागून एक, कधी कधी तर सकाळी + संध्याकाळी व ते सुद्धा दोन किंवा तीन वेगवेगळ्या बुरशी नाशकांची, स्वतंत्र अथवा एकत्रपणे फवारणी करतात. इतक्या औषधांची गरज आहे का?

  • फवारणी यंत्राने पूर्ण कॅनोपी मध्ये सर्व भागावर औषध व्यवस्थित पोहचते आहे का?
  • कॅनोपीमध्ये हवा खेळती राहते का ?
  • दवाने किंवा औषधाने पाने जास्त काळ ओली राहतात का ?
  • औषधाचा pH योग्य आहे का ?
  • फवारणी यंत्राचे नॉझलची तपासणी करून कॅलिब्रेशन केले आहे का?
  • फवारणी करताना औषधाने पूर्ण पान ओले होते का ?  
  • परिणामकारक औषधांची निवड करून प्रतिबंधात्मक अथवा उपचारात्मक वापर अचूकपणे करता येणार नाही का ?

जास्त औषधांच्या वापराने पानांवरती थर तयार होऊन शोषण क्रिया वरती परिणाम होऊ शकतो. पावडरीच्या थराने प्रकाश संश्लेषणच्या क्रियेवर हि परिणाम होऊ शकतो. याशिवाय जास्त वापराने पिकावरती रासायनिक अवशेष राहतात व पीकावरती त्याचा काही प्रमाणात दुष्परिणाम होतो. याशिवाय रोग/किडीमध्ये प्रतिकारक्षमता वाढते. याबाबत विचार होऊन कमीत कमी रोग/कीड नाशकांचा वापर केला तर वेळ, पैसा, श्रम मध्ये बचत होऊन कार्यक्षमतेमध्ये वाढ होईल. द्राक्ष पिकवणाऱ्या इतर देशांमध्ये जेमतेम १५ ते २० फवारण्या १८० ते १९० दिवसाच्या हंगामामध्ये घेतल्या जातात. या उलट तुलनेने आपल्याकडे भरपूर सूर्यप्रकाश व स्वच्छ हवामान असूनही १२० ते १५० दिवसाच्या द्राक्ष हंगामामध्ये, किमान ६० फवारण्या घेतल्या जातात. नक्कीच आपले काहीतरी चुकते आहे.

अनेक शेतकरी मशागत, खत वापर, फवारणी, कामगतीचे शेड्युल (schedule) मागतात. बहुतेक शेड्युल दिवसवार केलेली असतात. पण शेड्युल प्रमाणे तुमची शेती चालते का ? प्रत्येक पिकाची वाढ जमीन, पाणी, वाण, सूक्ष्म वातावरण इत्यादी प्रमाणे होते. त्यामुळे दुसऱ्याच्या शेड्युलचा तुम्हाला काय उपयोग ?. कीड, रोग नसताना सुद्धा शेड्युल प्रमाणे फवारणी करणारे शेतकरी आहेत. याचा विचार करावा.  

अनेक शेतकरी स्वत:चे अनुभव अथवा शिक्षणाचा वापर न करता दुसऱ्याच्या सल्ल्याने कीड/रोग, खत व इतर बाबींचे नियोजन करतात. इतरांचा सल्ला, घेऊन तुमची कार्यक्षमता वाढून वेळ, पैसा व श्रम मध्ये बचत होत असेल, व त्याशिवाय उत्पन्न (उत्पादकता नाही) वाढत असेल, तर जरूर वापर करावा. लक्षात ठेवा, सर्वात कमी उत्पादने (निविष्ठा) वापरून उत्तम आर्थिक फायदा मिळवणे हे शेतकऱ्याचे धोरण असले पाहिजे. पिकास सर्वाधिक लागणाऱ्या घटकांपैकी म्हणजे सूर्यप्रकाश, पाणी, कर्बवायू, प्राणवायू हे निसर्गाने फुकट दिलेले आहेत. वनस्पतीच्या शुष्क पदार्थांपैकी ९६.४७% हा भाग कर्ब ऑक्सीजन, हाइड्रोजन पासून बनला आहे व केवळ ३.५३% हे नत्र, स्फुरद, पालाश अधिक १४ सूक्ष्म अन्नद्रव्ये पासून बनलेले आहेत. म्हणूनच भरमसाठ खत, कीड/रोग नाशक, टॉनिक वापरण्याची गरज आहे का? रासायनिक निविष्ठा अजिबात न वापरणाऱ्यांची सुद्धा शेती होते. त्यांना अधिक आर्थिक फायदा मिळतो असे देखील दिसून येते. 

तक्ता क्रमांक १

टीप: (संदर्भ: (UNESCO Institute for Water Education )

  • यामध्ये पावसाचे पाणी, भूपृष्ठावरील पाणी, भूगर्भातील पाण्याचा समावेश आहे. 
  • सदर माहिती जागतिक स्तरावरील आहे. काही पिकांच्या बद्दल भारतातली माहिती स्वंतंत्र दिलेली आहे.  
सदर लेखमालेतील लेख आवडला असल्यास इतरांना या लेखाची लिंक पुढे पाठवा तसेच या ब्लॉगला फॉलो (Follow) करा. Follow करण्यासाठी https://ecoagroservices.blogspot.com/ या लिंकला जा व पान उघडा. पानाच्या खालच्या उजव्या कोपऱ्यात  या चौकटीवर क्लिक आहेत्यावर क्लिक करा.  नवीन लेख प्रकाशित होताच त्याची सूचना तुम्हाला ई-मेल द्वारे प्राप्त होइल

लेखाबाबत काही प्रश्न / सूचना असल्यास आपण ecoagropune@gmail.com या ई-मेलच्या माध्यमातून आम्हाला पाठवू शकता.

Comments

  1. खूप सुंदर. एवढे मस्त मराठी कधी टाईप करतोस? लेख खूप छान आणि माहितीपूर्ण आहे.

    ReplyDelete
  2. पाण्याचे काटेकोर व्यवस्थापन करण्यासाठी महत्वपूर्ण लेख 👍

    ReplyDelete

Post a Comment