खताचा क्षार निर्देशांक - सॉल्ट इंडेक्स (लेख क्रमांक ३६)

 श्री रवींद्र थत्ते, 
संचालक, 
इको ऍग्रो ग्रुप, पुणे.

खतामध्ये क्षार असतात. रासायनिक खते जमिनीत पेरून देताना त्या रासायानिक खताची क्षारता किती आहे हा मुद्दा लक्षात घेणे आवश्यक आहे. कारण, रासायनिक खत बियाण्याच्या / मुळांच्या जवळ असले तर त्याने बियाणांची उगवण क्षमता कमी होणे अथवा रोपांना इजा होऊ शकते हे आपल्याला माहित आहे. क्षार निर्देशांक हे नेमेके किती खत वापरले तर त्याने पिकाला इजा होईल हे दर्शवत नाही, परंतु विविध खतांची तुलना करण्यास मदत करते व त्यामुळे पिकाचे संभाव्य नुकसान टाळता येते.  

जास्त क्षारामुळे होणारे दुष्परिणाम:

  • कमी उगवण.
  • रोपांना इजा.
  • खुंटलेली वाढ.
  • जमीनीची संरचना बिघडणे व त्यामधील सूक्ष्म जीवांचा संहार.       

रासायनिक खतामधल्या क्षारामुळे परासरण दाब (ऑस्मोटिक प्रेशर) वाढतो. परासरण दाब वाढल्यामुळे जमीनीतील कमी दाबाचे पाणी, इतकेच नाही तर मुळातील पाणी उच्च दाबाकडील क्षार / खताकडे जाते. त्यामुळे बियाणांची उगवण थांबू शकते / रोपे मरू शकतात.


आकृती १-अ मध्ये मुळामधील परासरण दाबा पेक्षा सभोवताली जास्त क्षारा मुळे उच्च परासरण दाब निर्माण झाल्यावर मुळातील पाणी बाहेर पडत असल्याचे दाखवले आहे. आकृती १-ब मध्ये मुळांच्या पेशी शुष्क / मृत झाल्याचे दिसते.    

रासायनिक खताच्या कणामधील क्षारांमुळे उच्च परसारण दाब तयार होतो. परसरण दाब कमी असलेले पाणी उच्च दाबाकडे जाते.

क्षारांच्या प्रभावामुळे पाण्याचे होणारे वहन (परासरण दाबाचे परिणाम):

१. जास्त क्षार निर्देशांक (हायपरटोनिक द्रावण) : जेव्हा पेशींमधील क्षारांचे प्रमाण हे पेशी बाहेर असणाऱ्या द्रावणापेक्षा कमी असते तेव्हा पेशीच्या पडद्यामधून पाणी बाहेर पडते. (पाण्याचे बाहेरच्या दिशेने वहन होते), परिणामतः पेशींचे आकुंचन होऊन त्यांना इजा पोहचते.

"जास्त क्षार निर्देशांक (हायपरटोनिक द्रावण)"


२. संतुलित द्रावण (क्षारांची समान तीव्रता) (आयसोटोनिक द्रावण): संतुलित अवस्थेत, पाणी पेशीच्या पडद्यामधून बाहेर जाते व आत हि येते. (पाण्याचे दोन्ही दिशेने वहन होते)

"संतुलित द्रावण (क्षारांची समान तीव्रता) (आयसोटोनिक द्रावण)"

३. कमी क्षार निर्देशांक (हायपो-टॉनिक द्रावण): जेव्हा पेशींमधील क्षारांचे प्रमाण हे पेशी बाहेर असणाऱ्या द्रावणापेक्षा जास्त असते तेव्हा पाणी पेशीच्या पडद्यामधून आत शिरते. (पाण्याचे आतल्या  दिशेने वहन होते), परिणामतः पेशी फुगून त्यांना इजा होऊ शकते.  

"कमी क्षार निर्देशांक (हायपो-टॉनिक द्रावण)"

परासरण दाबासाठी संवेदनशीलता विविध पिकांमध्ये वेगवेगळी असते. उदा: ज्वारी हि गव्हापेक्षा जास्त संवेदनशील आहे. 

फवारलेल्या खताचा क्षार निर्देशांक अथवा तीव्रता जास्त असेल तरी पानामधील पाणी बाहेर गेल्यामुळे जळ/इजा होऊ शकते.

तक्ता १: पिकांची क्षार सहनशीलता भिन्न असते:

कमीत कमी (सर्वात कमी) संवेदनशील याचा अर्थ असा नाही की पीक क्षारसाठी असंवेदनशील आहे. संदर्भ: रीड (२००६).

कपाशी, सोयाबीन सारख्या तेलबिया संवेदनशील असून, खते काळजीपूर्वक पेरून देणे गरजेचे आहे. उष्ण वातावरण, जमिनीत कमी आर्द्रता अशा परिस्थितीत जास्त तसेच अयोग्य खताचा वापर केल्यास क्षारामुळे पिकाला इजा होते. अनेक वेळेला बियाणे सोबतच खत पेरले जाते (सीड रो प्लेसमेंट) रोपाची मुळे जवळ असलेल्या खताचा त्वरित वापर करू शकतात पण यामध्ये इजा पण होऊ शकत असल्यामुळे फार कमी प्रमाणात खत बियांण्यासोबत वापराता येते. यामध्ये मुक्त अमोनिया (NH) असलेली खते जास्त इजा करतात उदा: DAP. युरियाच्या वापराने देखील मुक्त अमोनिया तयार होतो. सीड रो पद्धतीने पेरणी करायची झाल्यास खालील गुणधर्माची रासायनिक खते योग्य ठरतील: 

  1. क्षारता निर्देशांक - कमी
  2. पाण्यात विद्र्व्यता – जास्त
  3. नत्र-स्फुरद-पालाश व गंधक युक्त असावे. (त्यामध्ये स्फुरदाचे प्रमाण भरपूर असावे)
  4. नत्र हा युरिया तसेच अमोनियम स्वरूपाचा असावा.
  5. पालाश हे क्लोराईड ऐवजी पोटॅशियम फॉस्फेट स्वरूपातील असावे. 

पेरणीयंत्रा सोबत बियाणांपेक्षा जास्त खोलीवर व बियाणांपासून काही अंतरावर (किमान २ इंच) पेरून दिलेले खत हे चुनखडीयुक्त, कमी स्फुरद असलेल्या प्रदेशासाठी अतिशय योग्य ठरते.

कोणते रासायनिक खत मातीच्या द्रावणामध्ये किती तीव्रतेचे क्षार निर्माण करतो यावर क्षार निर्देशांक आधारित आहे. क्षार निर्देशांक हि संज्ञा १९४३ मध्ये एल.एफ. रेडर, एल.एम. व्हाईट आणि सी.डब्लू. विट्टेकर या शास्त्रज्ञांनी पहिल्यांदा वापरली व शोध निबंध प्रसिद्ध केला. त्या वेळेला १००% विद्राव्य असलेले रासायनिक खत – सोडियम नायट्रेट याचा निर्देशांक १०० असा ठरवला गेला आणि त्याची तुलना इतर खतांशी करायची पद्धत अवलंबली.

काही खतांचे सॉल्ट इंडेक्स:


यामध्ये दिसून येते कि जास्त घटक असलेले खतांचा क्षार निर्देशांक जरी जास्त असला तरी एकंदरीत कमी खत वापरावे लागल्यामुळे त्याचा क्षार निर्देशांक कमी असतो. उदा: कॅल्शियम नायट्रेटचा क्षार निर्देशांक ६५ तर युरियाचा ७४ आहे, तरी देखील नत्राचा पुरवठा करण्यासाठी तुलनेने युरिया पेक्षा जास्त प्रमाणात कॅल्शियम नायट्रेट वापरावे लागेल व त्यामुळे क्षाराचे प्रमाण वाढणार.

सर्वसाधारणपणे क्लोराईड युक्त खतांचा क्षार निर्देशांक जास्त असतो. MOP (म्युरेट ऑफ पोटॅश / पोटॅशियम क्लोराईड) मध्ये सर्वाधिक प्रमाणात क्षार असतात व ४७% क्लोरीन असते जे पिकास व जमिनीस हानिकारक ठरू शकते. अनेक वेळा मिश्र खतांमध्ये पालाल्श ची मात्र हि पूर्णतः MOP या माध्यमातून भागवली जाते.

संपूर्ण कुजलेल्या सेंद्रिय पदार्थमधील (कंपोस्ट, शेणखत) मधील नत्र पिकाला उपलब्ध स्थितीमध्ये नसतो. जमीनीतील सूक्ष्म जीवांणूकडून त्यांचे परिवर्तन केल्यानंतर तो उपलब्ध होते. जमीनीच्या परिस्थितीनुसार १ वा अधिक महिन्याच्या कालावधीत तो उपलब्ध होतो. मात्र कच्चे (न कुजलेले) शेण, मूत्र / कोंबडीची विष्ठा यामध्ये विद्राव्य स्वरुपातील नत्र असतो व यापासून निघाणाऱ्या अमोनिया मुळे मुळांना इजा होऊ शकते.

बंदिस्त गोठ्यांमध्ये उच्च प्रतीचे खाद्य असलेल्या दुभत्या जनावरांच्या शेणखतामध्ये पुष्कळ प्रमाणात (५-१०%) क्षार आढळून येतात. त्यामुळे खूप जास्त प्रमाणात (एकरी २० टन) इतके शेणखत वापरले तर त्यापासून सुद्धा मुळांना क्षाराची इजा होऊ शकते.

सदर लेखमालेतील लेख आवडला असल्यास इतरांना या लेखाची लिंक पुढे पाठवा तसेच या ब्लॉगला फॉलो (Follow) करा. Follow करण्यासाठी https://ecoagroservices.blogspot.com/ या लिंकला जा व पान उघडा. पानाच्या खालच्या उजव्या कोपऱ्यात  या चौकटीवर क्लिक आहेत्यावर क्लिक करा.  नवीन लेख प्रकाशित होताच त्याची सूचना तुम्हाला ई-मेल द्वारे प्राप्त होइल

लेखाबाबत काही प्रश्न / सूचना असल्यास आपण ecoagropune@gmail.com या ई-मेलच्या माध्यमातून आम्हाला पाठवू शकता. 

Comments

Post a Comment